पुणे : “वेळ आहे उमेदवार बदलता येईल”, असे सूचक विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार, पक्ष विचार करेल, असेही बावनकुळे म्हणाले.
कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ४८ तासांत उमेदवार बदलतो, निवडणूक बिनविरोध करणार का? असे आव्हान महाविकास आघाडीला दिले होते. त्यासंदर्भात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनीही वेळ आहे, उमेदवार बदलता येईल, असे सांगत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – होय आम्ही लढतोय, उद्या फॉर्म भरतोय; कसबा निवडणुकीवर हिंदू महासंघाची भूमिका
महाविकास आघाडीचा उमेदवार नसेल तर टिळकांना उमेदवारी दिली जाईल. चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे नेतृत्व विचार करेल. चंद्रकांत पाटील यांची भूमिका पक्षाला मान्य आहे. महाविकास आघाडीने आज तसे कळवले तर उद्याचा दिवस बाकी आहे. उमेदवार बदलण्याचा निर्णय निश्चितपणे घेता येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
मुक्ता टिळक हयात असत्या तर प्रश्नच नव्हता. कोणी कोणाला डावलत नाही. ब्राह्मण समाजाने भाजपासाठी आयुष्य दिले आहे. पक्षाने ब्राह्मण समाजाला न्याय दिला आहे आणि ब्राह्मण समाजानेही खूप काही दिले आहे. महाविकास आघाडीने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पाठिंबा दिला तर उमेदवार बदलण्याचा विचार करण्यात येईल. भाजप कुणावर अन्याय करत नाही. महाविकास आघाडीने एक पाऊल मागे घेतले तर दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुका बिनविरोध करायला तयार आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.