पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून आपल्या राज्यात देखील प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. या दोन्ही आघाड्यांमध्ये अनेक जागा वाटपावरुन पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज आहेत. तो तिढा सोडण्यात प्रत्येक पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या सर्व राजकीय घडामोडी दरम्यान आज पुणे शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या उपनेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक राजकीय घडामोडीबाबत भाष्य केले.
भाजपच्या दबावामुळे भावना गवळी, हेमंत गोडसे यांसह अन्य विद्यमान खासदाराना तिकीट नाकारण्यात आले आहे. सध्या अशी चर्चा सुरू आहे त्या प्रश्नावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सकाळच्या व्याख्यानाचा परिणाम एवढ्या मोठ्या प्रमाणावर करून घेऊ नका. अशा शब्दात अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व परिस्थिती पाहून हे निर्णय घेतले आहेत. तसेच नाशिकच्या जागेचा सतत उल्लेख केला जात आहे. त्याबाबत मी एक सांगू इच्छिते की, नाशिकच्या जागेचा उमेदवार अद्यापपर्यंत जाहीर झालेला नाही. त्यामुळे त्यावर लगेच भाष्य करणे योग्य राहणार नाही. त्या जागेचा निर्णय योग्य वेळी सर्वांना समजेल, तसेच ज्यांना वाटते की, आमच्या वाट्याला अधिक जागा आल्या आहेत. त्यांना ४ जून रोजी निकाला वेळी दिसून येईल, अशा शब्दात अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाला त्यांनी टोला लगावला.
आणखी वाचा-पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका
राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे आमचा प्रवास चार चाकीमधून सुरू झाला : नीलम गोऱ्हे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे राज्यात कितपत फायदा होऊ शकतो. त्या प्रश्नावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीरपणे पाठिंबा दर्शविला आहे. त्यांच्या पाठिंब्याचं आम्ही स्वागत करीत आहोत, राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे नक्कीच फायदा होणार आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असणार आहेत. त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रित काम करणार आहे. त्यामुळे आज एक सांगू इच्छिते की, आतापर्यंतचा आमचा प्रवास तीन चाकीमधून सुरू होता. आता राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे आमचा प्रवास चार चाकीमधून सुरू झालेला असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.