चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी भाजपा मैदानात उतरली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे हे इतर पदाधिकाऱ्यांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या शहराध्यक्षांची भेट घेत आहेत. त्यांना पत्र देऊन चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती करत आहेत. सदसद्विवेकबुद्धीने विचार करून जगताप कुटुंबीयातुन कोणत्याही उमेदवाराविरोधात आपला उमेदवार उभा करू नये असे आवाहन पत्राद्वारे भाजपा विरोधकांना करत आहे. असे असले तरी, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट हे पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे तीन जानेवारी रोजी निधन झाले. ते चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. आमदारकीची जागा रिक्त झाल्याने आता केंद्रीय निवडणूक आयोगाने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जाहीर केली आहे. भाजपाकडून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट पोटनिवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता फारच कमीच आहे. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपा मात्र आग्रही आहे. भाजपाकडून पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा >>> लव्ह आणि जिहाद माहित आहे, पण लव्ह-जिहाद माहिती नाही: सुप्रिया सुळे
भाजपा विरोधकांना देत असलेल्या पत्रात नेमकं काय आहे?
दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी घडवले. अनेकांना महानगर पालिकेच्या आणि पक्षाच्या माध्यमातून महत्वाची पदे दिली. त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी केली. पिंपरी- चिंचवड शहर घडवण्यात जगतापांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे सदसद्विवेकबुद्धीने विचार करून जगताप कुटुंबीयातून कोणत्याही उमेदवाराविरोधात आपला उमेदवार उभा करू नये अशी अपेक्षा आहे. असे पत्रात नमूद आहे.