भाजपाने कसबा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांपैकी कोणालाही उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. कुटुंबियांपैकी कोणालाही संधी न दिल्याने शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला आहे. हिंदू महासंघ संघटनेचे आनंद दवे यांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपण कसबा पोटनिवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. आनंद दवे यांना निवडणूक आयोगाकडून बासरी हे चिन्ह मिळाले आहे. चिन्ह मिळाल्यानंतर देव यांनी आपला प्रचाराला वेग आणला असून भाजपवार जोरदार टीका केली. भाजपाचे हिंदुत्व बेगडी असल्याचे सांगत पुण्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे ते म्हणाले.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत असताना ते म्हणाले, “भाजपाने आमच्या प्रश्नांना कधी प्रतिसाद दिला नाही. भाजपचं हिंदुत्व कसं बेगडी आहे, हे देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही दाखवून देणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मुंबईतील बोहरी समाजाच्या कार्यक्रमात गेले होते. तिथे ते म्हणाले की, मी जन्मतः बोहरी आहे आणि चार पिढ्या बोहरी समाजात वावरत आहे. भाजपाला आताच का हे करावं लागत आहे. त्यामुळे हिंदू समाज नाराज झालेला आहे.”, अशी टीका आनंद दवे यांनी केली.
माझ्या प्रचारामुळे अमित शहा प्रचारासाठी कसब्यात
ब्राह्मण उमेदवार या मुद्द्यावर निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर प्रचारात मात्र आनंद दवे सर्वच समाजाचा पाठिंबा त्यांना मिळेल, असे सांगत आहेत. कसबा मतदारसंघात खुल्या प्रवर्गातील ६० टक्के समाज आहे. तो सर्व मला पाठिंबा देत आहे. तसेच हिंदू असलेले राजस्थानी, जैन समाज देखील मला पाठिंबा देत आहे. कसब्यात मी निवडणूक लढवत असल्यामुळे भाजपाला ही निवडणूक जड जाईल, असे वाटत आहे. त्यामुळेच भाजपाला केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री यांना प्रचारासाठी आणावे लागत आहे. याआधी कसब्याच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री आले नव्हते, असा दावा आनंद दवे यांनी केला.
मनसेकडेही दवेंनी मागितला होता पाठिंबा
“कोणत्याही राजकीय पक्षाने प्रत्येक निवडणुकीत तटस्थ राहण्यापेक्षा कोणतीतरी भूमिका घेणं गरजेचं असतं. राज ठाकरे हे भाजपाला पाठिंबा देतील, असं वाटत होतं. मात्र, आतापर्यंत त्यांनी असे कोणतेही संकेत दिले नाहीत. खरं तर कसबा मतदारसंघात मनसेची ठरावीक मतं आहेत. ती मतं जर मला मिळाली, मनसेनी मला पाठिंबा दिला, तर माझा विजय सोपा होऊ शकतो आणि मनसेचा एक हक्काचा आमदार विधानसभेत जाऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरेंनी याचा विचार करावा”, अशी प्रतिक्रिया आनंद दवे यांनी दिली. तसेच आतापर्यंत याबाबतीत राज ठाकरेंशी कोणताही संपर्क झाला नसून मी मीडियाच्या माध्यमांतून त्यांच्याकडे मागणी करतो आहे” अशी मागणी त्यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीकरिता भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही संधी न दिल्याने शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली होती.