पुणे : लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागांचा विचार करूनच अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत. लोकसभा आणि विधानसभेतील जागा वाटपाचा निर्णय महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते आणि केंद्रीय संसदीय समितीकडून घेतला जाईल. महायुतीमधील घटक पक्षाच्या उमेदवारांना भाजपकडून ताकद दिली जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे स्पष्ट केले. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार कोण असेल, याचे उत्तर बावनकुळे यांनी टाळले. मात्र महायुतीचा उमेदवार बारामतीमधून विजयी होईल आणि २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत राज्यातील ४५ पेक्षा जास्त खासदार असतील, असा दावाही त्यांनी केला.
रायगड, बारामती, शिरूर आणि शिर्डी यांच्यासह हातकंगणले, कोल्हापूर, माढा, सातारा या लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक बावनकुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात आली. या सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली.
हेही वाचा >>> VIDEO : संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून सात वाजता मुठा नदीत पाणी सोडणार
उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमध्ये आले, तेव्हा ते सर्व बाबींचा विचार करून आले आहेत. कोणत्या जागा कोण लढविणार, याचा निर्णय या बैठकीत झालेला नाही. उमेदवार निश्चित झालेले नाहीत. मात्र, तिन्ही पक्षाचे नेते याबाबत चर्चा करून याेग्य निर्णय घेतील. महायुतीच्या उमेदवाराला भाजपकडून ताकद दिली जाईल. राज्यातून महायुतीचे ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून येतील. भाजपसोबतची महायुती वर्षानुवर्षे चालणार आहे. चिन्हाचा कोणताही वाद नाही. काँग्रेसची अवस्था बिकट आहे. काँग्रेसला विरोधी पक्षनेताही ठरविता येत नाही. काँग्रेसमध्ये असंतोष असून त्याचा स्फोट केव्हाही होऊ शकतो, असे बावकुळे यांनी सांगितले.
बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी राजकीय टीका करावी; पण ते वैयक्तिक बोलतात. त्यांची मानसिक स्थिती ढासळलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे ठाकरे यांना सांभाळले. मात्र, त्यांच्याकडे असलेली खासदार आणि आमदारही त्यांच्याकडे फार दिवस राहणार नाही. मुख्यमंत्री बदलाची चर्चा काँग्रेस घडवून आणत आहे. मात्र महायुती भक्कम आहे.