गणेश यादव
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून रायगड जिल्ह्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. सलग १५ वर्षे मावळचे प्रतिनिधित्व पिंपरी-चिंचवडकडे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांकडून रायगडमधील उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
रायगडमधील तीन विधानसभा मतदारसंघांपेक्षा पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतील मतदारसंख्या एक लाख ३४ हजाराने जास्त आहे. लोकसभा मतदारसंघाची २००९ मध्ये पुनर्रचना झाली. या पुनर्रचनेत पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ विधानसभा आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश करत मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. सलग तीन वेळा मावळची खासदारकी पिंपरी-चिंचवडकडे आहे.
हेही वाचा >>> पिंपरी : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर गुन्हा
रायगड जिल्ह्याला एकदाही मावळचे लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे रायगडमधून उमेदवार देण्याची मागणी पुढे येत आहे. मावळ मतदारसंघात २४ लाख ३२ हजार ८१० मतदार आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील पिंपरीत तीन लाख ५७ हजार २०७, चिंचवडमध्ये पाच लाख ६६ हजार ४१५, मावळ विधानसभा मतदारसंघात तीन लाख ५९ हजार ९६२ असे १२ लाख ८३ हजार ५८४ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल विधानसभा मतदारसंघात पाच लाख ४६ हजार ३४२, कर्जत दोन लाख ९९ हजार ८११, उरणमध्ये तीन लाख ३० हजार ७३ अशा तीन विधानसभा मतदारसंघात ११ लाख ४९ हजार २२६ मतदार मावळ मतदारसंघात आहेत. रायगडपेक्षा पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतील मतदारसंख्या एक लाख ३४ हजाराने जास्त आहे.
हेही वाचा >>> पुणे: तीन दिवसांत मोसमी पाऊस गतिमान,वाटचालीसाठी पोषक स्थिती
या मतदारसंघाच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत गजानन बाबर आणि २०१४ पासून सलग दोनवेळा शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी प्रतिनिधित्व केले आहे. दोघेही पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने दोनवेळा राहुल नार्वेकर, पार्थ पवार हे बाहेरचे उमेदवार उभे केले होते. तीन निवडणुकांमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत झाली. आता शिवसेना दोन गटात विभागली आहे. खासदार बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेत आहेत. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यामुळे बारणे यांना आगामी निवडणूक सोपी राहणार नसल्याचे दिसते. त्यातच भाजपने सर्वेक्षणानंतर मावळातून कोणी निवडणूक लढवायची, हे ठरणार असल्याचे सांगितले आहे.
पनवेलचे सलग तीनवेळा आमदार असलेले प्रशांत ठाकूर यांना भाजपने मावळ लोकसभा प्रमुखपदी नेमले आहे. त्यामुळे ठाकूर यांच्याकडे मावळचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. तर, खासदार बारणे यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस देखील यावेळी रायगड जिल्ह्यातून उमेदवार देण्याच्या विचारात असल्याचे सांगितले जाते. मागीलवेळी दारुण पराभव झाल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ यावेळी निवडणूक लढविण्याची शक्यता कमी आहे. त्यांनी मतदारसंघात संपर्कही ठेवला नाही. रायगड जिल्ह्यात राजकीय वजन असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना मावळातून रिंगणात उतरविण्याच्या हालचाली राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही प्रमुख पक्ष मावळच्या रिंगणात रायगड जिल्ह्यातील उमेदवार उतरवतात का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.