पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांनी रविवार सुट्टीच्या निमित्ताने मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला. या भेटीदरम्यान, भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी दहा हजार कार्यकर्त्यांनी दहा लाख मतदारांपर्यंत ‘मोदींचा नमस्कार’ पोहोचविला, तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांना मतदारांनी लोकसहभागातून जमा केलेला निधी दिला.
हेही वाचा >>> मर्चंट नेव्हीत काम करणारा पुण्यातील तरूण बेपत्ता… झाले काय?
लोकसभेसाठी पुण्यात तिरंग लढत होणार आहे. भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारांकडून सध्या भेटीगाठी, विविध समाज घटकांच्या बैठका, पक्षांअंतर्गत विधानसभा मतदारसंघाअंतर्गत बैठका अशा पद्धतीने प्रचार सुरू झाला आहे. रविवारच्या निमित्ताने त्याला गती मिळाली.
भाजपच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘हर घर मोदी परिवार’ अभियानाअंतर्गत भाजपच्या दहा हजार कार्यक्रत्यांनी दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, खासदार प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णी यांच्यासह सर्व आमदार या अभियानात सहभागी झाले होते. अडीच लाख कुटुंबातील दहा लाख मतदारांशी यावेळी संपर्क साधण्यात आला.
हेही वाचा >>> पिंपरी: विरोधकांचे पैसे घ्या पण मतदान महाविकास आघाडीला करा- शिवसेना उमेदवार संजोग वाघेरे
काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांच्याकडून काही दिवसांपासून भेटीगाठी सुरू आहेत. कोथरूड येथील काँग्रेसच्या मेळाव्यावेळी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन जमा केलेला ४२ हजार रुपयांचा निधी धंगेकर यांना प्रचारासाठी दिला. लोकांच्या अडीअडचणीला धंगेकर नेहमी धावून जातात. त्यामुळे त्यांंना मदत दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंतची मदत घेत हा निधी देण्यात आला. या निधीमुळे कार्यकर्त्यांना आणि जनतेला मनातील कळते, माझे आणि जनतेचे नाते किती घट्ट आहे, हे यातून दिसतून येते, अशी प्रतिक्रिया धंगेकर यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनाही काही नागरिकांनी भेटीदरम्यान मदत केली. त्याची माहिती मोरे यांनी समाजमाध्यमातून दिली. वंचित बहुजन आघाडीचा मी उमेदवार आहे. माझी लढाई दोन मोठ्या राष्ट्रीय पक्षांबरोबर होणार आहे. अजून निवडणुकीचा प्रचार वेगाने सुरू झालेला नाही तोच सर्वसामान्य नागरिकांकडून मदतीचा हात पुढे केला जात आहे, असे सांगत मोरे यांनी मदत करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले.