पुणे : राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संधी मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करावा लागणार असून, प्रवेशासाठी गुणवत्ता यादी ११ सप्टेंबरला जाहीर होणार आहे.

शिक्षण विभागाने ही माहिती दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित, चार विशेष फेऱ्या राबवण्यात आल्या आहेत. पाचव्या विशेष फेरीत पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केंद्रीभूत प्रवेश, कोट्यातील जागांसाठी ४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करावा लागेल. त्यानंतर ११ सप्टेंबरला गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना ११ ते १५ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.