पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापकांच्या १११ रिक्त जागांसाठी सुरू करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेची तांत्रिक अडचणींमुळे सहा महिने रखडपट्टी झाली आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सध्या सुरू असून, आता सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) घटकांतील उमेदवारांनाही अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे पात्रताधारक उमेदवारांना आणखी काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांमध्ये रिक्त असलेल्या जागांपैकी १११ जागांसाठीची भरती प्रक्रिया डिसेंबर २०२३ मध्ये सुरू करण्यात आली. विद्यापीठांमध्ये बऱ्याच वर्षांत भरती झाली नसल्याने पात्रताधारकांचे या भरतीकडे लक्ष लागले होते. त्यामुळे या जागांसाठी विद्यापीठाकडे सुमारे पाच हजार अर्ज दाखल झाले. मात्र त्यानंतर अनेक तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया रखडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सुमारे तीन महिने ही प्रक्रिया ठप्प होती. त्याशिवाय राज्य सरकारने सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) घटकांना आरक्षण लागू केल्याने त्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी देणे आवश्यक आहे. त्यासाठीची बिंदुनामावली तयार करणे, ती शासनाकडून तपासून घेणे अशी तांत्रिक प्रक्रिया विद्यापीठाकडून पूर्ण करण्यात आली. आता त्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी काही दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर त्या अर्जांची छाननी करावी लागणार आहे. तसेच प्रत्येक विषयाची निवड समिती स्थापन करणे आवश्यक आहे. ही सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन मुलाखतीच्या टप्प्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>>‘रिंगण सोहळा पाहिला म्या डोळा’; तुकोबांच्या पालखी सोहळ्यात अश्वांचे रिंगण

राज्यभरातील उमेदवार गेल्या सहा महिन्यांपासून भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तरी भरती प्रक्रिया होणार का, असा प्रश्न पात्रताधारक उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे. भरतीसाठीची सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुलाखतींंचा टप्पा होईल.- डॉ. पराग काळकर, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidates will have to wait for professor recruitment pune print news ccp 14 amy
Show comments