आवळा कँडी, काजू, आंब्याचा रस ही शेतक ऱ्यांनी बनवलेली उत्पादने आता ‘ऑनलाइन’ विकली जाऊ लागली आहेत. शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांकडून प्रक्रिया केलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘वसुंधरा अ‍ॅग्री- हॉर्टी प्रोडय़ूसर कंपनी लि.’ने (व्ॉपकॉल) ‘स्नॅपडील’ या ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळावर ही उत्पादने उपलब्ध करून दिली आहेत.   
‘बायफ’ विकास संशोधन संस्थेने सुरू केलेल्या ‘व्ॉपकॉल’ या कंपनीद्वारे महाराष्ट्र, राजस्थान आणि दक्षिण गुजरातमधील शेतक ऱ्यांच्या उत्पादनांचे विपणन केले जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २० मोठे गट या कंपनीला माल पुरवत असून १४ ते १६ हजार शेतक ऱ्यांचा या गटांमध्ये समावेश आहे. ‘व्ॉपकॉल’चे प्रमुख कार्यालय पुण्यात असून उत्पादनांचे विपणनही येथूनच केले जाते.
‘वृंदावन- फ्रॉम द रूट्स ऑफ इंडिया’ या ‘ब्रँड नेम’ खाली ही उत्पादने विकली जात आहेत. त्यात आवळा कँडी, भाजलेले तसेच मीठ व तिखट लावलेले काजू, आंब्याचा रस, आंब्याचे सुकवलेले काप या पदार्थाचा समावेश आहे. उत्पादनांच्या ऑनलाइन विक्रीतून मिळणारा नफा शेतक ऱ्यांमध्ये वाटून दिला जाणार असल्याची माहिती ‘बायफ’च्या विकास अधिकारी रमा मिश्रा यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘‘ऑनलाइन विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये आम्ही प्रत्येक पदार्थ स्वतंत्रपणे न विकता पदार्थाचे ‘कॉम्बो पॅक’ करून विकत आहोत. मोठय़ा कंपन्या एकेक पदार्थ वेगळा ऑनलाइन विकू शकतात. आमची कंपनी त्या तुलनेत लहान असल्याने आवळा, काजू आणि आंब्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ एका ‘कॉम्बो’मध्ये ग्राहकांना मिळतील. या शिवाय शेतकरी व कारागिरांनी बनवलेल्या सिल्कच्या साडय़ा देखील ऑनलाइन उपलब्ध आहेत. २५ ऑक्टोबरपासून आम्ही ‘स्नॅपडील’वर उत्पादने विकू लागलो. या उत्पादनांचा ब्रँड बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळे अजून विक्रीस म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. पण आमच्या पदार्थाना जम्मू-काश्मीर, गुवाहाटी अशा ठिकाणाहूनही मागण्या आल्या. आमची उत्पादने लोकांना माहीत होतील तसा त्यांचा खप वाढू शकेल.’’
या उत्पादनांमधील काजू नाशिक पट्टा आणि दक्षिण गुजरातमधून येतात. तर आवळ्याचे पदार्थ उदयपूरमधील शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांकडून येतात. आंब्याचे पदार्थ देखील दक्षिण गुजरातच्या शेतक ऱ्यांचे आहेत.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा