रामटेकडी येथील कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाच्या ठिकाणी कचऱ्यात दुपारी चारच्या सुमारास तोफगोळा आढळून आला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने पाहणी करून हा तोफगोळा सुरक्षित ठिकाणी पुरून ठेवला आहे. तो ब्रिटिशकालीन असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, तो उद्या लष्कराच्या ताब्यात दिला जाणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी येथील औद्योगिक वसाहत येथे रोकेम सेपरेशन सिस्टीम इंडिया हा कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प आहे. तो महापालिकेने बीओटी तत्त्वावर चालविण्यास दिला आहे. या ठिकाणी शहरातून कचरा येतो. मंगळवारी चारच्या सुमारास येथील कर्मचारी कानिफनाथ जाधव आणि सूर्यकांत मोजर यांना कचऱ्यामध्ये तोफगोळ्यासारखी वस्तू दिसून आली. त्यांनी तत्काळ काम बंद करून पोलिसांना कळविले. वानवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तोफगोळ्याची पाहणी करून तो सुरक्षित ठिकाणी पुरून ठेवण्यात आला आहे. हा तोफगोळा ब्रिटिशकालीन असण्याची शक्यता असून तो लष्कराकडे बुधवारी दिला जाणार आहे. या तोफगोळ्याचे वजन साधारण दहा ते बारा किलो असून तो एक फूट चार इंच लांब असून पाच इंचाचा व्यास आहे. हा कोठून व कसा आला याचा शोध सुरू आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असाच तोफगोळा आढळून आला होता. काही महिन्यांपूर्वीही लोणीकाळभोर येथील कचरा डेपोमध्ये तोफगोळा सापडला होता.
रामटेकडी येथील कचऱ्यात तोफगोळा सापडला
रामटेकडी येथील कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाच्या ठिकाणी कचऱ्यात दुपारी चारच्या सुमारास तोफगोळा आढळून आला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने पाहणी करून हा तोफगोळा सुरक्षित ठिकाणी पुरून ठेवला आहे.

First published on: 12-06-2013 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cannonball found in garbage