हिंजवडी फेज टूमध्ये एका कंपनीत खोदकाम सुरू असताना गेल्या शनिवारी तोफगोळा आढळून आला. पण, तो बाजूला काढून ठेवण्यात आला होता. रामटेकडी येथे मंगळवारी कचऱ्यामध्ये तोफगोळा आढळून आल्याची बातमी आल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती हिंजवडी पोलिसांना दिली. पोलिसांनी हा तोफगोळा सुरक्षित ठिकाणी पुरून ठेवला आहे. गेल्या आठवडय़ातील ही तिसरी घटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज टू येथे ओमनी अॅक्टीव्ह हेल टेक्नॉलॉजी लि. या ठिकाणी खोदकाम सुरू आहे. ८ जून रोजी गवंडी गोरख नवसुपे यांना हा तोफगोळा आढळून आला. त्यांनी तो बाजूला काढून ठेवला होता. पण, बुधवारी कचऱ्यामध्ये तोफगोळा सापडल्याच्या बातम्या आल्याने कंपनीचे प्रशासकीय अधिकारी मधुकर लांजेकर यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. हिंजवडी पोलीस, बॉम्बशोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या तोफगोळ्याची पाहणी केली. हा तोफगोळा अकरा इंच लांब, तर चार इंच व्यास असून, तो गंजलेला आहे. पोलिसांनी हा तोफगोळा ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी ठेवला आहे. हा तोफगाळा सुद्धा ब्रिटिशकालीन असण्याची शक्यता आहे. तो लष्कराच्या ताब्यात दिला जाणार आहे. या घटनेच्या एक दिवस अगोदर म्हणजे सात जून रोजी सयाजी हॉटेलजवळ एका ठिकाणी खोदकाम सुरू असताना असाच तोफगोळा आढळून आला होता. गेल्या आठवडय़ात तोफगोळा सापडल्याची ही तिसरी घटना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा