पुणे : राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा काळात शिक्षकांसाठी १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत क्षमतावृद्धी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मात्र, परीक्षेचे कामकाज करताना प्रशिक्षणाला उपस्थित कसे राहायचे, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिकेच्या समग्र शिक्षा विभागाच्या सचिव आशा उबाळे यांनी प्रशिक्षणाचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांतील शिक्षकांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अंतर्गत जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यातर्फे करण्यात येत आहे. या प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत शिक्षण) २०२३, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, क्षमताधारित मूल्यांकन, संकल्पना आणि कार्यनीती, क्षमताधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया अशा विषयांचा समावेश आहे.
चार टप्प्यात होणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये १० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत बारावी, दहावी, आठवीचे शिक्षक, १७ ते २२ फेब्रुवारी कालावधीत अकरावी, दहावी आणि सातवीचे शिक्षक, २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत दुसरी, चौथी आणि सहावीचे शिक्षक, तर ३ मार्च ते ७ मार्च या कालावधीत पहिली, तिसरी आणि पाचवीच्या शिक्षकांनी, तर मुख्याध्यापकांनी कोणत्याही एका टप्प्यात सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशिक्षण आयोजित करणे महत्त्वाचे होते. परीक्षेनंतरही प्रशिक्षण आयोजित करणे शक्य होते. शिक्षकांना परीक्षेसाठी शाळेतील तयारीसह परीक्षेचेही कामकाज करावे लागते. अशा परिस्थितीत प्रशिक्षणामध्ये सहभागी कसे व्हायचे, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.