पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कार आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना मळवली या ठिकाणी हा अपघात झाला. जय सावंत आणि विकास सावंत अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर अश्विनी राणे आणि आर्या सावंत या गंभीर जखमी झाल्या आहेत. भरधाव कारने समोरील मालवाहू ट्रकला भीषण धडक दिली. यात कारमधील दोघांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
हेही वाचा – नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात; पाच ठार एक गंभीर जखमी
पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कारचालकाचे नियंत्रण सुटून कारने समोरील भरधाव मालवाहू ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सोमटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. कार आणि मालवाहू ट्रक एकाच लेनवर असताना हा अपघात झाला आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. राणे आणि सावंत कुटुंब हे सिंधुदुर्ग येथील आहे. ते पुण्यातून मुंबईतील मुलुंड येथे जात होते. तेव्हा प्रवाशांपैकी दोघांवर काळाने घाला घातला.