भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील पाषाण रस्त्यावर घडली. या प्रकरणी मोटार चालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल जोशी (वय ७३, रा. बाणेर रस्ता, बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
जोशी यांचा मुलगा योगेश (वय ४२) यांनी या संदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मोटार चालक पल्लवी गुप्ता (रा. बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार अनिल जोशी पाषाण रस्त्यावरुन जात होते. त्या वेळी एचईएमआरएल कंपनीसमोर भरधाव मोटारीने दुचाकीस्वार जोशी यांना धडक दिली. अपघातानंतर जोशी यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मोटार चालक पल्लवी गुप्ता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या माहिती-तंत्रज्ञान कंपनीत अभियंता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी तपास करत आहेत.