आजवर उपेक्षित असलेल्या गिर्यारोहण क्षेत्रास केवळ समाजाभिमुख नाहीतर उच्च शिक्षण प्रशिक्षण व्यासपीठ देणाऱ्या गिरिप्रेमीच्या ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग’ (जीजीआयएम) संस्थेस १६ फेब्रुवारीला दहा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने संस्थेच्या या आडवाटांवरील प्रवासाचा हा आढावा…
‘आता कुठली नवीन मोहीम?’ किंवा ‘आज कुठल्या डोंगरावर?’ गेल्या अनेक वर्षांत हे प्रश्न मित्रमंडळी आणि आप्तांकडून ऐकणे सरावाचे झालंय. पूर्वी या प्रश्नांत कुतूहल, काळजी आणि चौकशी असायची, पण अलीकडे त्यात आपुलकीही जाणवते. यामागचे मुख्य कारण म्हणजे गिर्यारोहणाला समाजात मिळालेला लोकाश्रय. आजच्या घडीला गिर्यारोहण आणि साहस हा केवळ काही मोजक्या लोकांचा छंद न राहता समाजाच्या सर्व स्तरांमध्ये त्याचे पडसाद दिसत आहेत, त्याची व्याप्ती वाढत आहे, किंबहुना त्याही पलीकडे गिर्यारोहण क्षेत्रात पूर्ण वेळ करियर घडू शकते ही बाब हळूहळू सर्वांना उमजू लागली आहे. अशा प्रकारचे करियर करायची संधी मला ज्या संस्थेमुळे मिळाली ती म्हणजे ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग’ अर्थात ‘जीजीआयएम’ची. आज या संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त, हा संपूर्ण प्रवास आठवत असताना असंख्य आठवणी मनात तरळत आहेत. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांतली सुरुवातीची भटकंती, बेलाग कड्यांवर केलेले प्रस्तरारोहण, हिमालयातील बर्फाच्छादित डोंगरांवर पहिल्यांदा ठेवलेले पाऊल, आणि तिथून पुढे भारतातील व जगातील सर्वोच्च शिखरांपर्यंतचा प्रवास आणि अशा अनेक!
गिरिप्रेमीच्या २०१२-१३ च्या एव्हरेस्ट मोहिमेचा मी भाग होतो आणि २०१३ साली प्रत्यक्ष ‘सगरमाथा’ अर्थात ‘एव्हरेस्ट’च्या कृपेने मी भारताचा तिरंगा घेऊन पृथ्वीच्या सर्वोच्च बिंदूवर काही क्षण आनंदाचे वेचू शकलो. भारतातील सर्वांत मोठी नागरी मोहीम यशस्वी करून परत आल्यावर, एव्हरेस्ट पुरतेच न थांबता गिर्यारोहण क्षेत्रात काहीतरी मोठे करायचे असा आम्ही सर्व गिरिप्रेमींनी संकल्प सोडला. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत गिर्यारोहणाची एखादी प्रशिक्षण संस्था सुरू करता येईल का, याबाबत गिरिप्रेमींच्या ज्येष्ठ गिर्यारोहकांमध्ये विचारविनिमय सुरू झाला, मीदेखील त्या चर्चेत कुतूहलाने सहभागी होतो. मला गिर्यारोहण या विषयातील समज आल्यापासूनच या क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्याची माझी खूप इच्छा होती. म्हणजे परदेशी गिर्यारोहक जसे फक्त पर्वतारोहण हेच उपजीविकेचे साधन म्हणून वापरतात तसे भारतातही काहीतरी करू शकतो का, असा मी नेहमी विचार करत असे. गिरिप्रेमीच्या प्रशिक्षण संस्थेच्या या विचाराने माझ्या मनाचा ठाव घेतला. २०१५ साली जशी उमेश झिरपे यांनी प्रशिक्षण संस्थेची म्हणजे गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग’ची (‘जीजीआयएम’) मुहूर्तमेढ रोवली, तसा मी लगेचच त्या प्रकल्पाचा काया-वाचा-मने भाग झालो. एक वेगळा ध्यास घेऊन आम्ही काम सुरू केले, जिथे गिर्यारोहण फक्त साहस न राहता त्याचे विविध अभ्यासक्रम विकसित होतील, साहस हा सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनेल, जिथे अनेक गिर्यारोहक आपले करियर देखील घडवू शकतील अशी शिस्तबद्ध व्यवस्था उभी करण्याचा हा तो ध्यास..!
इन्स्टिट्यूटची घोषणा होताच आयआयटी पवईतून एमटेक झालेला विवेक शिवदे संघात आला. उमेश झिरपे, निरंजन पळसुले, अविनाश फौजदार यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि विवेकने काम सुरू केले. गिर्यारोहण या विषयासाठी प्रशिक्षण संस्था ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी मनीष साबडे यांचे योगदान आणि प्रोत्साहन खूपच मोलाचे होते. हळूहळू आमच्या कामाची व्याप्ती वाढत गेली आणि आणखी काही समविचारी मंडळी या कार्याचा भाग होत गेली. गिर्यारोहण आणि साहस हा गाभा ठेवून प्रशिक्षणाचे विविध अभ्यासक्रम आधी कल्पनेत, मग कागदावर आणि मग प्रत्यक्ष डोंगरात राबवायला आम्ही सुरुवात केली. १० ते १६ वयोगटातील मुलांसाठी ‘आव्हान – निर्माण – उडान’ अभ्यासक्रम, प्रस्ताररोहणातील बेसिक आणि ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स ते अगदी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मान्यताप्राप्त झालेला पदविका अभ्यासक्रम असे अनेक अभ्यासक्रम ‘जीजीआयएम’ मध्ये विकसित झाले. हे सर्व अभ्यासक्रम प्रामुख्याने डोंगरात व निसर्गात राबविले जातात, प्रत्येक अभ्यासक्रमात गिर्यारोहणातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाबरोबरच नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, साहस, विजिगीषू वृत्ती, इतिहास, भूगोल, भवताल आणि पर्यावरण संवर्धनाचे मूलभूत धडे दिले जातात, जे सुदृढ समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात.
आज ‘जीजीआयएम’ ही केवळ एक संस्था नाही, तर ती एक मोठे कुटुंब आहे. प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक, गिर्यारोहक, साहसप्रेमी आणि मार्गदर्शक यांनी एकत्र येत ही चळवळ उभी केली आहे. गेल्या दहा वर्षांत आम्ही सतत प्रयोगशील राहण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला महिन्यातून एखादा दुसरा रविवार ते आता महिन्यातील किमान २० दिवस उपक्रम अशा प्रकारे संस्थेच्या कामाची व्याप्ती वाढत गेली आहे. यामुळे संस्थेत पूर्णवेळ काम करणाऱ्यांची संख्याही आता २ वरून २० वर पोहोचली. समाजातील सर्व स्तरांतील सुमारे २०००० प्रशिक्षणार्थींना साहस प्रशिक्षण देतादेता आम्ही देखील खूप काही शिकलो. गिर्यारोहण हा अभ्यासक्रमाचा भाग बनावा या आमच्या धडपडीची दखल घेत अनेक शाळांनी, महाविद्यालयांनी, उद्योगसमूहांनी साहसी प्रशिक्षण उपक्रम राबवायला सुरुवात केली. पुण्यातील यशदा संस्थेच्या सहकार्याने आता भारतीय पोलीस सेवा अधिकारी (आयपीएस) आणि आयआरएस अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यात आले.
यशापयशाच्या या हिंदोळ्यावर प्रवास करताना आपली संस्था आर्थिकदृष्ट्या स्वयंनिर्भर व्हावी आणि तिथं काम करणाऱ्या प्रत्येकाचा चरितार्थ चालावा या भावनेतून ‘जीजीआयएम’ चे सर्व संचालक निरपेक्ष भावनेने जीवाचं रान करत आहेत. आपण लावलेले हे रोपटे कोविडसारख्या महाभयंकर संकटातही जगवायचे यासाठी या सर्वांनी वेळप्रसंगी पदरमोडही केली. त्यांचा हा भक्कम पाठिंबा ही आमची सर्वांची प्रचंड मोठी ताकद आहे. या दहा वर्षांच्या प्रवासात ‘जीजीआयएम’ शी जोडले गेलेले प्रशिक्षणार्थी, त्यांचे पालक, कुटुंबीय जेव्हा ‘’जीजीआयएम’ चे ताई – दादा आमच्या मुलांचे ‘रोल मॉडेल्स आहेत’ असे म्हणतात तेव्हा आपण करत असलेल्या कामाचे चीज झाले असे वाटते आणि तितकीच भविष्यातील वाटचालीसाठी उभारी मिळते. या आगळ्या-वेगळ्या करियरमुळे आमची पर्वतांशी आणि निसर्गाशी जोडलेली नाळ ही दिवसेंदिवस भक्कम होत गेली. ‘जीजीआयएम’ चा प्रत्येक प्रशिक्षक एक उत्तम गिर्यारोहक असावा या सर्व ज्येष्ठांच्या विशेषत: उमेश झिरपे यांच्या आग्रहामुळे आमचे सर्वांचे गिर्यारोहणदेखील बहरले. कांचनजुंगा, अन्नपूर्णा-१ यांसारख्या शिखरांना गवसणी घालण्यासाठीचे पाठबळ आम्हाला मिळाले.
पर्वतांमधला हा थरार अनुभवताना वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेली कसरत आणि साधावा लागणारा समतोल हा देखील फारच रोमांचक अनुभव आहे. त्यात मला माझ्या कुटुंबीयांची अत्यंत मोलाची साथ लाभली ज्यामुळे मला ही आगळीवेगळी धडपड करणे शक्य झाले. साहसी प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविणाऱ्या दक्षिण भारतातील एकमेव संस्थेची, ‘जीजीआयएम’ची आज दशकपूर्ती आहे, आणखी बरीच मजल गाठायची आहे. आजवरच्या यशाचा आनंद साजरा करत असताना भविष्याचा वेध घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. संस्थेमार्फत अधिक प्रगत अभ्यासक्रम विकसित करणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे, पर्यावरणपूरक सुरक्षित गिर्यारोहण जनमानसात रुजविणे आणि भारताच्या नकाशावर डौलाने शोभून दिसेल अशी जागतिक दर्जाची संस्था उभी करणे हे आमचे ध्येय आहे. यासाठी सर्व साहसप्रेमी हितचिंतक व आमच्या मार्गदर्शकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्यासोबत राहोत, ही सह्याद्री आणि हिमलयाकडे नम्र प्रार्थना.
भूषण हर्षे, मुख्य प्रशिक्षक, ‘जीजीआयएम’