प्रथमेश गोडबोले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या जलाशयात बुधवारी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन करणाऱ्या खासगी कंपनीची खोकी आणि बाटल्या आढळून आल्या. हा प्रकार धरणाची सुरक्षा करणाऱ्या सुरक्षारक्षकाला लक्षात आल्यानंतर तातडीने स्थानिक पोलीस, जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, या प्रकारामुळे धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

खडकवासला धरणाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना बुधवारी दुपारच्या सुमारास जलाशयाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात काही खोटी आढळून आली. काही खोकी पाण्याजवळ, तर काही बाटल्या पाण्यात फेकल्याचे निदर्शनास आले. यामध्ये जैववैद्यकीय कचरा असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. सुरक्षा रक्षकांनी तातडीने ही माहिती जलसंपदा विभाग, पोलिसांना माहिती दिली. जलसंपदाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यातून खोकी, बाटल्या बाहेर काढल्या. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून धरणाच्या पाण्याची तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आले, तर पोलिसांकडून धरणाच्या पाण्यात कोणी खोकी, बाटल्या टाकल्या याबाबत तपास सुरू करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा-विद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये भरलेले अनामत शुल्क दोन वर्षांत परत घ्या, नाहीतर…

दरम्यान, खडकवासला धरणाच्या परिसरात गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या ठिकाणी अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक सुट्यांच्या दिवशी, खासकरुन शनिवार, रविवारी या ठिकाणी गर्दी करतात. धरणाच्या पाण्यात उतरण्यास बंदी आहे. मात्र, अनेक पर्यटक धरणाच्या पाण्यातही उतरतात. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र मोठे असल्याने सुरक्षारक्षकांना मर्यादा आहेत. बुधवारच्या प्रकारानंतर दिवसभर धरण परिसरात १३ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.

जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन करणाऱ्या एका खासगी कंपनीची खोकी आणि बाटल्या खडकवासला धरणाच्या जलाशयात टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. मात्र, ही खोटी आणि बाटल्या रिकाम्या होत्या. तातडीने ही माहिती स्थानिक पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविण्यात आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषण किंवा परिणामांबाबत तपासणी करण्यात येत आहे, तर पोलिसांकडून या प्रकाराबाबत तपास करण्यात येत आहे. -श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carelessness in security of khadakwasla dam bio medical waste in reservoir pune print news psg 17 mrj