अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ८८ अध्यक्षांची अर्कचित्रे ही संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या घुमान येथे पाहण्याची संधी लाभणार आहे. सुरेश लोटलीकर यांनी चितारलेल्या या संमेलनाध्यक्षांच्या अर्कचित्रांसह वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, िवदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या साहित्यिकांच्या अर्कचित्रांचाही यामध्ये अंतर्भाव आहे. घुमानआधी पुणेकरांना ही अर्कचित्रे पाहण्याची संधी लाभली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झाल्याला सव्वाशे वर्षे झाली. या वाटचालीत झालेले सारे ८८ संमेलनाध्यक्ष पाहण्याचे भाग्य साऱ्यांनाच लाभले नाही. त्यापैकी जुन्या कालखंडातील संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात कृष्णधवल छायाचित्रांमध्येच पाहावयास मिळतात. ही कसर भरुन काढत अगदी पहिल्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे यांच्यापासून ते घुमान येथील संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे या सर्व संमेलनाध्यक्षांची रंगीत अर्कचित्रे सुरेश लोटलीकर यांनी रेखाटली आहेत. सरस्वती लायब्ररी आणि साहित्यवेध प्रतिष्ठानतर्फे घुमान येथे साहित्य संमेलनाच्या आवारात ही अर्कचित्रे लावण्यात येणार आहेत. प्रतिष्ठानचे कैलास भिंगारे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मूळचे सांगलीचे असलेले सुरेश लोटलीकर हे शिक्षणानिमित्त मुंबईला स्थायिक झाले. चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेले नाही. लहानपणापासून चित्रं काढण्याची आवड आणि इतरांची चित्रे पाहतच त्यांची कला फुलत गेली. वेगवेगळ्या शहरांत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन यापूर्वी भरले असून त्यांना रसिकांची भरभरून दाद मिळाली आहे. साहित्य संमेलन हे मोठे व्यासपीठ आता त्यांना मिळणार आहे. त्यापूर्वी १८ ते २० मार्च या कालावधीत ही अर्कचित्रे बालगंधर्व कलादालन येथे दररोज सकाळी साडेदहा ते रात्री आठ या वेळात साहित्यप्रेमींना पाहता येतील. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते १८ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार, एमआयटीचे संस्थापक प्रकाश जोशी, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, स्वागताध्यक्ष भारत देसडला, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल आणि महापालिका उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक या वेळी उपस्थित राहाणार आहेत.
या अर्कचित्रांबाबत सुरेश लोटलीकर म्हणाले,‘‘ १९९० च्या सुमारास मी ५० संमेलनाध्यक्षांची अर्कचित्रे रेखाटली होती. ‘ग्रंथाली’ने त्याचे प्रदर्शनही भरविले होते. ‘लोकसत्ता’ने माझी ही अर्कचित्रे प्रकाशित केली होती. त्यानंतर गेल्या महिन्यांत पुन्हा एकदा हा विषय मी हाती घेतला. उर्वरित ३८ माजी संमेलनाध्यक्षांची चित्रे जलरंगामध्ये रेखाटली आहेत. सारी अर्कचित्रे ही साहित्यिकांच्या छायाचित्रावरून केली आहेत. नव्याने केलेल्या चित्रांपैकी राजेंद्र बनहट्टी यांचे अर्कचित्र चितारणे ही माझ्यासाठी कसोटी ठरली. ही अर्कचित्रे पाहताना रसिकांना त्या साहित्यिकाच्या स्वभावाचे दर्शन घडेल असा विश्वास मला वाटतो.’’

Story img Loader