व्यंगचित्रकारांची संख्या मुळातच कमी आहे, त्यात व्यंगचित्रकार होऊ पाहणारे दुसऱ्या क्षेत्राकडे वळू लागले आहेत. ही परिस्थिती सुधारण्याची गरज असून त्यासाठी सर्वानी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी आकुर्डीत बोलताना व्यक्त केले. राज्यकर्त्यांना व्यंगचित्रकार नकोसे असतात. वरवर ते व्यंगचित्रकाराचे कौतुक करतात. मात्र, त्यांच्या डोक्यात राग असतोच आणि तो स्वाभाविकही आहे, अशी टिपणीही त्यांनी केली.
प्राधिकरणातील जयहिंद लोकजागर व्याख्यानमालेत ‘व्यंगचित्र : एक कला’ या विषयावर ते बोलत होते. नगरसेवक बाबासाहेब धुमाळ, नंदा ताकवणे, संयोजक राजेश फलके, बाळा शिंदे आदी उपस्थित होते.
तेंडुलकर म्हणाले, व्यंगचित्रे हद्दपार होऊ लागली आहेत. या दुर्लक्षित प्रकाराकडे लक्ष देणे अवघड आहे. व्यंगचित्रकाराच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणूनही कोणी उपलब्ध होत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनातील कोंडमारा, अस्वस्थता व्यक्त करण्याचे व्यंगचित्र हे प्रभावी माध्यम आहे. शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक व मारावे लागणारे हेलपाटे यामुळे त्यांच्या मनात साचलेला राग हिंसाचाराला प्रवृत्त करू शकतो. मात्र, त्या भावना व्यक्त करण्याचे काम व्यंगचित्र करते. व्यंगचित्र या माध्यमाचा चुकीचा अर्थ घेऊ नये. ते कोणाच्या चारित्र्यहननाचे माध्यम नाही. ती चित्रांची भाषा असून त्यातून प्रभावीपणे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न असतो. अलीकडे, व्यंगचित्रकाराकडून भावना दुखवण्याचे निमित्त शोधून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

Story img Loader