पिंपरी : रात्री दहा वाजल्यानंतर निवडणूक प्रचार फेरी काढून नियमांचा भंग केल्याप्रकरणी मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार, आमदार सुनील शेळके यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री पावणेबारा वाजेपर्यंत प्रचार फेरी काढण्यात आली.

याप्रकरणी निवडणूक विभागाचे कर्मचारी दीपक भाऊराव राक्षे (वय ५३, रा. सोमाटणे फाटा) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आमदार शेळके (वय ४५) यांच्यासह नामदेव सावळेराम दाभाडे (दोघे रा. तळेगाव दाभाडे) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बाॅम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल

हेही वाचा – शहरबात : नेमेचि येते ‘आवाजा’ची दिवाळी!

मावळचे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार, आमदार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ दाभाडे यांनी मंगळवारी (५ नोव्हेंबर) शिरगाव हद्दीतील आढले खुर्द व चांदखेड या गावांमध्ये प्रचार फेरीचे आयोजन केले होते. त्यासाठी मावळ विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियम व अटीनुसार प्रचार फेरीला परवानगी दिली होती. मात्र, ही फेरी रात्री दहा वाजल्यानंतर काढण्यात आली. रात्री दहानंतर प्रचारास बंदी असताना देखील ही फेरी काढण्यात आली. रात्री पावणेबारा वाजेपर्यंत फेरी सुरू होती. त्यामुळे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.