पुणे : गॅस एजन्सीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याच्या आमिषाने साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी यांच्यासह त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मंगेश जगदीश खरे (रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी श्रीराम गॅस एजन्सीचे मालक मयुरेश उदय जोशी, उदय त्र्यंबक जोशी (रा. दांडेकर पूल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार बांधकाम ठेकेदार आहेत. मयुरेश यांची श्रीराम गॅस एजन्सी आहे. उदय यांनी खरे मुलगा मयुरेश याच्या गॅस एजन्सीत रक्कम गुंतविण्यास सांगितले. बँकेपेक्षा जादा परतावा देऊ, असे आमिष त्यांनी दाखविले होते.
खरे यांनी १४ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने श्रीराम गॅस एजन्सीच्या बँक खात्यावर जमा केले. खरे यांच्यासह दहाजणांनी गॅस एजन्सीत पाच कोटी ५३ लाख ८ हजार रुपये गुंतविले होते. जोशी यांनी गुंतवणूक केलेली रक्कम बँकेत ठेवल्याचे सांगितले. खरे यांच्यासह गुंतवणूकदारांना कोणताही परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खरे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.