पुणे : शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या शिकवणी चालक तरुणाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिकवणी चालक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण खासगी शिकवणी घेतो. पीडित मुलगी त्याच्याकडे शिकवणीसाठी जायची. आरोपी तिला अश्लील चित्रफीत दाखवायचा. तू जर अभ्यास करताना चुकली तर तुला शिक्षा देईल, असे सांगून तिच्याशी अश्लील कृत्य करायचा. घाबरलेल्या मुलीने याप्रकाराची माहिती आईला नुकतीच दिली. त्यानंतर आईने पोलिसांकडे तक्रार दिली.

हेही वाचा – पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त

हेही वाचा – पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे वय २५ वर्ष असून, त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दोडमिसे तपास करत आहेत. कोंढवा भागातील एका शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाला पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. कर्वेनगर भागातील एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांशी नृत्यशिक्षकाने अश्लील कृत्य केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी नृत्यशिक्षकासह संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केली होती. शहरात अल्पवयीनांवरील अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

Story img Loader