पुणे : राज्यातील यंदाचा ऊस गाळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. तरीही इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती ॲग्रो या कारखान्याने आज, सोमवारी गाळप हंगाम सुरू केला आहे. हा सरकारच्या आदेशाचा भंग असल्याने कारखान्याच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप नेते राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित हा कारखाना आहे.
यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करावा, असा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत झाला आहे. १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांच्या कार्यकारी संचालक आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १९ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. १५ ऑक्टोबरपूर्वी कारखाना सुरू केल्यास महाराष्ट्र राज्य साखर कारखाने आदेश, १९८४ खंड चारचा भंग होतो, असे निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा : भूमिगत मेट्रो मार्गिकेतील काम पूर्ण होणारे शिवाजीनगर हे पहिले स्थानक
दरम्यान, राज्यातील साखर कारखान्यांनी १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरू केल्यास संबंधित साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश नुकतेच साखर आयुक्तालयाने प्रसृत केले होते.
हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?
राम शिंदे – रोहित पवार वाद चव्हाट्यावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार आणि भाजप नेते राम शिंदे यांच्यातील राजकीय वाद सर्वज्ञात आहे. रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता. बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून भाजपने राम शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. या कारखान्यावरून दोघांतील राजकीय वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
कारखान्याच्या ठिकाणी मंगळवारी जाऊन खात्री करण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील कारवाई होणार आहे. बारामती ॲग्रोने २२ सप्टेंबर रोजी आयुक्तालयाला पत्र पाठवून कारखाना एक ऑक्टोबरपासून सुरू करण्याची परवनगी मागितली होती. त्या वेळीही संबंधितांना १५ ऑक्टोबरनंतर कारखाने सुरू करण्याचा निर्णय झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. – शेखर गायकवाड, साखर आयुक्त