पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विराेधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोबाइलवर एक ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात आली होती.
ध्वनिचित्रफीत महिलेच्या पाहण्यात आली. त्यात माजी आमदार जाधव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्याचे आढळून आले. जाधव यांनी समाजमाध्यमावर गृहमंत्री शहा आणि पालकमंत्री पाटील यांच्याबाबत अवमानकारक शब्द वापरत त्यांची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दत्तवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.