पुणे: महापालिका भवन परिसरात पीएमपी बसची वाट पाहत थांबलेल्या दोघांना रिक्षाचालक आणि साथीदाराने लुटल्याची घटना घडली.याप्रकरणी रिक्षाचालकासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जितेंद्रकुमार बाबूलाल (वय २९, सध्या रा. सूस गाव, पाषाण-सूस लिंक रस्ता) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूलाल आणि त्याचा मेहुणा मजुरी करतात. दोघे जण शनिवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास छत्रपती शिवाजी पुलावर पीएमपी बसची वाट पाहत थांबले होते.

त्या वेळी रिक्षाचालक आणि साथीदार तेथे आले. रिक्षाचालकाने कुठे जायचे आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर जितेंद्रकुमार आणि त्याचा मेहुण्याला मारहाण करुन रिक्षाचालक आणि साथीदारांनी दोघांकडील १४०० रुपये काढून घेतले. जितेंद्रकुमारला धमकावून त्याला ऑनलाइन पद्धतीने एक हजार रुपये जमा करण्यास सांगितले. रिक्षाचालक आणि साथीदार तेथून पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.शहरात गेल्या काही दिवसांपासून पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पादचाऱ्यांना धमकावून त्यांचे मोबाइल संच आणि रोकड चोरून नेण्याच्या घटना घडतात.

Story img Loader