पुणे : गोखले राज्यशास्त्र अर्थशास्त्र संस्थेतील एक कोटी ४२ लाख रुपयांचा निधी नियमबाह्य पद्धतीने वळविल्याचा आरोपावरून सर्व्हंट्स ऑफ इंडियाचे सचिव मिलिंद देशमुख यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी मिलिंद देशमुख यांना अटक करण्यात आली. त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी दिली.

याबाबत डाॅ. विशाल भीमराव गायकवाड (वय ३९, रा. रामनगर, वारजे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डाॅ. गायकवाड हे २०२२ पासून गोखले राज्यशास्त्र संस्थेत संशोधन समन्वयक (रिसर्च को ऑर्डिनेटर) म्हणून काम पाहत होते. सध्या ते संस्थेत ‘ऑफिशिएटिंग डेप्युटी रजिस्ट्रार’ आहेत.

गोखले राज्यशास्त्र संस्था सर्व्हंट्स ऑफ इंडियाच्या अधीन आहे. शासकीय अनुदान, विद्यार्थ्यांचे शुल्क, तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निधीवर संस्थेचे कामकाज चालते. विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या नियमावलीनुसार शैक्षणिक संस्थेतील निधी अन्य खात्यांत वळवणे नियमबाह्य आहे. मिलिंद देशमुख यांनी १३ डिसेंबर २०२२ रोजी संस्थेला पत्र दिले. नागपूर येथील सर्व्हंट्स ऑफ इंडियाची जमीन ‘फ्री होल्ड’ करण्यासाठी दीड काेटी रुपयांची मागणी केली. संबंधित मागणी संस्थेतील कोणत्याही सदस्यांची परवानगी न घेता, तसेच ठराव न करता करण्यात आल्याचे डाॅ. विशाल गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

सर्व्हंट्स ऑफ इंडियाच्या पत्रावर गोखले राज्यशास्त्र संस्थेचा शिक्का आहे. त्यानंतर गोखले राज्यशास्त्र संस्थेतील नियामक मंडळाच्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी ही रक्कम मंजूर करण्यात आली. यापैकी एक कोटी दोन लाख रुपये नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर, तसेच ४० लाख रुपये धनादेशाद्वारे सोसायटीच्या खात्यावर पाठवण्यात आले. या रकमेचा वापर जुनी कागदपत्रे मिळवणे, मुद्रांक शुल्क, सल्लागार शुल्क, प्रशासकीय खर्च या कारणांसाठी दाखवण्यात आला. या खर्चाचा तपशील संशयास्पद आहे. मिलिंद देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेची फसवणूक करत स्वतःच्या फायद्यासाठी निधीचा अपहार केल्याचा आरोप डाॅ. गायकवाड यांनी फिर्यादीत केला आहे. डाॅ. गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला . वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.