पुणे प्रतिनिधी: आळंदी येथे पालखी प्रस्थानावेळी काही वारकर्‍यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्या प्रकरणी समस्त वारकरी समाजाने नाराजी व्यक्त केली होती. त्याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्त वारकरी समाजाची माफी मागावी अन्यथा पंढरपूर येथील शासकीय पूजा होऊ देणार नाही, असा व्हिडीओ संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट केला होता. तर या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात संतोष शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तुषार दामगुडे यांनी फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथे पालखी प्रस्थानावेळी झालेल्या एका घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्त वारकरी समाजाची माफी मागावी. अन्यथा पंढरपूर येथील शासकीय पूजा होऊ देणार नाही, असा व्हिडीओ संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी फेसबुकवर १२ जून रोजी पोस्ट केला होता.

आणखी वाचा-पुणे : शंभर दिवसांत दुप्पट परताव्याच्या आमिषाने ३६ लाखांची फसवणूक

संतोष शिंदे यांचं विधान हे दंगल घडवून आणणार आहे. तसेच लाखों भाविकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारे आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी तक्रार तुषार दामगुडे यांनी संतोष शिंदेंविरोधात केली. या तक्रारीच्या आधारे संतोष शिंदेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू असल्याचे सहकारनगर पोलिसांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case has been filed against santosh shinde of sambhaji brigade in connection with a video on facebook svk 88 mrj