लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : लष्कर भागातील एका शाळेच्या आवारात मुलावर अत्याचार करण्यात आले. मुलाशी अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत मुलाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

लष्कर भागातील एका शाळेच्या प्रसाधनगृहाच्या आवारात ही घटना घडली. पीडित मुलगा शाळेच्या आवारातील प्रसाधनगृहात गेला होता. शाळकरी मुलाने त्याला धमकावून त्याला विवस्त्र होण्यास भाग पाडले. त्याच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. मे महिन्यापासून मुलगा त्याचावर अत्याचार करत होता. अत्यचाारामुळे घाबरलेल्या मुलाने पालक, तसेच शाळेतील शिक्षकांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर मुलाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण (पोक्सो), तसेच अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी शाळेस भेट दिली. उपनिरीक्षक शिवनंदा जाधव तपास करत आहेत.

आणखी वाचा-पिंपरी : उद्योगनगरीतील ५२२ मुलांनी चढली नाही शाळेची पायरी; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती

शहरातील एका नामांकित महाविद्यालयात अल्पवयीन युवतीवर चौघांनी अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती, तसेच दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले होते. कोंढवा भागातील एका सोसायटीच्या आवारात मुलावर अल्पवयीनांनी अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली होती.

शहरातील बहुतांश शाळांमध्ये मुलांना योग्य आणि अयोग्य स्पर्श (गुड टच, बँड टच) काय असतो, याची जाणीव करून देण्यात येत आहे. शाळा आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेली जागृती, तसेच समुपदेशनामुळे बालकांवरील अत्याचारांच्या घटनांना वाचा फुटली आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गेल्या नऊ महिन्यांत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) ३५९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आणखी वाचा-चाकण एमआयडीसीतील गुन्हेगारांवर आता जरब; पोलीस आयुक्तांचा इशारा, “कंपनी व्यवस्थापनाला त्रास दिल्यास…”

बालकांवर अत्याचाराचे दररोज एक ते दोन गुन्हे पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत दाखल होतात. यामध्ये ९८ टक्के मुली आहेत. सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) ३५९ गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात ४०० जणांना अटक करण्यात आली. ‘पोक्सो’सह बलात्कार, विनयभंग कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बालकांवर लैंगिक अत्याचार करणारी व्यक्ती नातेसंबंधातील किंवा जवळची असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. काका, शिक्षक, शेजारी, वडिलांचा मित्र, मानलेले आजोबा, शाळेतील काका, मित्र, उच्चपदस्थ अधिकारी, शिक्षक, ओळखीची अल्पवयीन मुले, विद्यार्थी वाहतूक करणारे चालक अशांकडून हे गुन्हे केले जातात. अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना पळवून नेणे, तसेच त्यांच्यावर अत्याचार करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case has been registered against school boy in case of child molestation for unnatural act in school premises pune print news rbk 25 mrj