लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कात्रज-कोंढव्या रस्ता परिसरात रुंदीकरण, तसेच समतल विलगकाच्या (ग्रेड सेपरेटरच्या) कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत जगदीश छगन शिलावत (वय ३५, रा. केसर लॉजमागे, महाकाली मंदिराजवळील मोकळ्या जागेत, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिलावत कुटुंबीय चाकू, सुरीला धार लावून देण्याचे काम करतात. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील मोकळ्या जागेत ते झोपडी बांधून राहतात. रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. सरगम जगदीश शिलावत (वय १५), जनुबाई रमेश शिलावत (वय १६), तेजल जगदीश शिलावत (वय १२), मुस्कान देवा शिलावत (वय १६) खड्डयात साचलेल्या पाण्यात शनिवारी (८ जून) सकाळी अकराच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.
आणखी वाचा-Pune Accident Case : विशाल अगरवालचा पाय खोलात! आणखी एक गुन्हा दाखल
त्यावेळी मुस्कान खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पाय घसरून पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात सरगम, जनुबाई, तेजल पाण्यात उतरल्या. चौघी पाण्यात बुडाल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर जवानांनी चौघींना पाण्यातून बाहेर काढले. बेशुद्धावस्थेतील मुस्कानला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
ठेकेदाराने रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करत आहेत.