पुणे : दुबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगचे कुलूप तोडून ७ हजारांची रोख रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोहगाव विमानतळावरील स्पाईस जेट एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अर्जुन धोंडिबा जगताप (वय ४७, रा. विमान नगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार लोहगाव विमानतळावर स्पाईस जेट विमान नं. एसजी ५२ मध्ये मंगळवारी मध्यरात्री बारा वाजून दहा मिनिटे ते पहाटे साडेचारच्या सुमारास घडला.

हेही वाचा – कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक; शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे वादाची चिन्हे

हेही वाचा – पुणे : सेल्फी काढताना पाय घसरून तरुण – तरुणी इंद्रायणीत बुडाले; कुंडमळा येथील घटना

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. ते स्पाईस जेट विमानाने दुबईहून लोहगाव विमानतळावर उतरले. त्यांची बॅग पट्ट्यावरुन आली तेव्हा बॅगचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी बॅगेतील सामानाची तपासणी केली असता, बॅगेत ठेवलेले सात हजार रुपये चोरीला गेल्याचे आढळले. त्यावेळी जगताप यांनी सीआयएसएफ आणि कस्टमच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. बॅगेचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत विमान कंपनीच्या वतीने काहीही खुलासा न झाल्याने जगताप यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश साळुंखे करत आहेत.