सध्या तरुणाईचे आकर्षण असलेल्या सोशल मीडियाचा गैरवापर वाढतोय. सोशल मीडियावर चिथावणीखोर मजकूर, छायाचित्रे प्रसिद्ध केली जात आहेत. पण, प्रौढांपर्यत मर्यादीत असलेला सोशल मीडिया पालकांमुळे अल्पवयीन मुलांच्या हाती लागल्याने त्याचे दुष्पपरिणामही समोर येत आहेत. त्यात आता पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका १४ वर्षीय मुलाने स्वत:च्या सोशल मीडियावर आपल्या वर्गातील एका मुलीचा फोटो स्टेटसवर ठेऊन ‘माझी बायको होशील का?,’ असे विचारले आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर मुलीच्या आईने मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात पोलीस तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने या मुलीकडे मैत्रीची मागणी केली होती. माझ्याशी मैत्री कर नाहीतर तुला उचलून घेऊन जाईल, असे मुलाने म्हटलं होतं. मुलीने उत्तर न दिल्याने ‘माझी बायको होशील का?’ असा स्टेटस मुलाने इन्स्टाग्रावर ठेवला.
याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे म्हणाले, “दोन्ही मुलं आठवीच्या वर्गात शिकत आहे. मागील एक महिन्यापासून मुलगा मुलीचा पाठलाग करत मैत्री करण्याची विनंती करत होता. त्यानंतर मुलीच्या मैत्रिणीने तिला सांगितलं, तुझा फोटो मुलाने इन्स्टाग्रामवर ठेऊन ‘माझी बायको होशील का’? असं लिहलं आहे. ही माहिती कुटुंबियांना दिल्यावर मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुलाची परिक्षा सुरु आहे. परिक्षा झाल्यावर मुलाला बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : एकनाथ शिंदेंनी भविष्य पाहिल्यावरून अजित पवारांनी कान टोचले, हसत हसत म्हणाले, “ज्योतिषाकडे जाऊन…”
सायबर तज्ज्ञ अतुल खाते यांनी म्हटलं की, “पालकांनी आपल्या मुलांचे सोशल मीडियावर खाते आहे का? याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपली मुले लॅपटॉप, मोबाईल कशासाठी वापरतात याविषयी पालकांनी जागरुक असलं पाहिजे. त्यांच्या मोबाईलची तपासणी करायला हवी. मुलं कोणत्या जाळ्यात अडकत नाही ना? हे सुद्धा पालकांनी तपासलं पाहिजे, असे अतुल खाते यांनी सांगितलं. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.