लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : हडपसर भागताील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला, तसेच जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी विकास पांडुरंग हिंगणे , संतोष जयसिंग देशमुख, अशोक करंजीकर, कुमार यल्लप्पा अलकुंटे, विजय दत्तात्रय तुपे यांच्यासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलीस शिपाई शुभांगी म्हाळसेकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर गावातील डांगमाळ आळीतील एका घरात पत्यांवर पैसे लावून जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक युवराज हांडे आणि पथकाने तेथे छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी तेथून जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. हवालदार गायकवाड तपास करत आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील जुगार अड्डे, तसेच बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.