पुणे : राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या पेट्रोल पंपावर दहा हजारांची लाच घेताना पकडलेल्या वजन मापे निरीक्षकाच्या पुण्यातील घरात तब्बल २८ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने ही कारवाई केली. अशोक श्रीपती गायकवाड (वय ५२) असे कारवाई केलेल्या निरीक्षकाचे नाव आहे. प्रवरानगर येथील राधाकृष्ण विखे पाटील सहकारी संस्थेच्या पेट्रोल पंपाची वार्षिक तपासणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी गायकवाड याने १२ हजार रुपयांची लाच मागितली होती. दहा हजार रुपयांची लाच घेताना गायकवाड यांना पकडण्यात आले होते.
हेही वाचा…खासदार बारणे यांचा दिल्लीचा मार्ग खडतर ?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबतची माहिती पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने गायकवाड यांच्या सिंहगड रस्त्यावरील घराची झडती घेतली. गायकवाड यांच्या कपाटात २८ लाख ५० हजार रुपये सापडले, तसेच मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रे आढळून आली आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण, सहायक फौजदार मुकुंद आयचित, हवालदार नवनाथ वाळके, दामोदर जाधव यांनी ही कारवाई केली.