लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : दुचाकीस्वार महिलेकडील एक लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सहकारनगर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला तळजाई वसाहत भागात राहायला आहेत. त्या बुधवारी (५ मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास सहकारनगर भागातून दुचाकीवरुन मुलासोबत निघाल्या होत्या. महिलेने बँकेतून एक लाखांची रोकड काढून पिशवीत ठेवली होती.

विद्या विकास शाळेजवळ दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या हातातील रोकड असलेली पिशवी हिसकावून पोबारा केला. पिशवी हिसकावताच महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून , पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.

शहरात महिलांकडील दागिने हिसकावणे, तसेच पादचाऱ्यांकडील मोबाइल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अशा प्रकारचे १८० हून जास्त गु्न्हे दाखल झाले होते.

महिलेकडील अडीच लाखांचे दागिने चोरी

पादचारी महिलेकडील अडीच लाखांचे सोन्याचे दागिन चोरून नेण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. याबाबत एका महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या मंगळवारी वाघोली भागात गेल्या होत्या. मंगळवारी रात्री नऊच्या सुमाारास त्या ढोले पाटील महाविद्यालयाजवळ थांबल्या होत्या. दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरुन नेले. पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत.

Story img Loader