पुणे : वस्त्रदालनाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील तीन लाख ८० हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना नगर रस्त्यावरील केसनंद परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध लाेणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बालाजी टेक्सटाईल्सचे मालक सागरराम माली (वय २४, रा. केसनंद ग्रामपंचायत कार्यालयासमोर, नगर रस्ता) यांनी लोणीकंद (वाघोली) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माली यांचे केसनंद गावात बालाजी टेक्सटाईल्स दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटला. दुकानात शिरलेल्या तीन चोरट्यांनी गल्ला उचकटून तीन लाख ८० हजारांची रोकड चोरून नेली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी तीन चोरट्यांना टिपले असून, पोलिसांकडून त्यांचा माग काढण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार सैंगर तपास करत आहेत.
हेही वाचा >>>महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
विश्रांतवाडीत घरफोडी
सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटीतील एक लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेले होते. ते शनिवारी (१६ नोव्हेंबर) गावाहून परतले. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक अनिल पाडेकर तपास करत आहेत.