पुणे : व्यावसायिकाने रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना विमाननगर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा – अपंगांसाठी सरकारचा मोठा निर्णय! आता तालुका स्तरावरही मिळणार अपंग प्रमाणपत्र
हेही वाचा – वाल्मिक कराड प्रकरण : पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे याची सीआयडी कडून दोन तास चौकशी
नितेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा हे व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त मुंबईहून विमाननगर भागात आले होते. विमाननगर भागातील वाटिका सोसायटीसमोर त्यांनी रविवारी रात्री मोटार लावली. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली. पिशवीत ठेवलेली साडेदहा लाखांची रोकड चोरुन चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे तपास करत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटारींच्या काच फोडून रोकड, लॅपटाॅप, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हडपसर भागात दोन मोटारींच्या काचा फोडून चोरट्यांनी रोकड, दागिने चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली होती.