लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ज्येष्ठ नागरिकाकडील एक लाखांची रोकड असलेली पिशवी चोरट्याने चोरून नेल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार चिंचवड परिसरातील बिजलीनगर भागात राहायला आहेत. ते एका व्यावसायिकाकडे कामाला आहेत. व्यावसायिकाने खडकी बाजारातील एका सराफी पेढीच्या मालकाला दहा लाखांची रोकड देण्यास सांगितले होते. ते मंगळवारी (२५ मार्च) दुपारी दीडच्या सुमारास खडकी बाजार परिसरात आले. त्यांच्या मागावर चोरटा होता.

श्री महालक्ष्मी ज्वेलर्ससमोर चोरट्याने त्यांच्याकडील पिशवी हिसकाविली. त्यांनी आरडाओरडा केला. चोरटा दहा लाखांची रोकड असलेली पिशवी हिसकावून गर्दीत पसार झाला.

या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी खडकी बाजार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असून, चोरट्याचा माग काढण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमोले तपास करत आहेत.

कारखान्यातून साडेचार लाखांची रोकड चोरी

नगर रस्त्यावरील अष्टापूर भागात एका कारखान्यातून चार लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कामगाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारखान्याचे मालक अख्तर मोहम्मद सादीर खान (वय ४२, रा. अष्टापूर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शानू जियाउद्दीन (वय २७, रा. व्हिक्टोरिया गंज, हरदोई, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान यांचा अष्टापूर गावात सिमेंटपासून छोटे पाईप तयार करण्याचा कारखाना आहे. आरोपी शानू त्यांच्या कारखान्यात कामाला आहे. २१ मार्च रोजी ते दुपारी खान हे प्रसाधनगृहात गेले होते. कारखान्यातील चार लाख ७० हजारांची रोकड त्यांनी पेटीत ठेवली होती. खान तेथे नसल्याची संधी साघून आरोपी शानूने पेटी उचकटून रोकड चोरली. रोकड चोरुन आरोपी शानू पसार झाला. रात्री उशीरा खान यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या आरोपी शाून उत्तर प्रदेशात पसार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत,