पुणे : शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख १७ हजार रुुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना विधी महाविद्यालय रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत शाळेतील एका शिक्षिकेेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधी महाविद्यालय रस्त्यावर ही इंग्रजी माध्यम शाळा आहे. शाळेला रविवारी सुट्टी होती. मध्यरात्री चोरटे शाळेच्या आवारात शिरले. चोरट्यांनी शाळेच्या कार्यालयातील कुलूप तोडले. कपाटात ठेवलेली तीन लाख १७ हजार रुपयांची रोकड चोरुन चोरटे पसार झाले. सोमवारी सकाळी शाळेचे कार्यालय उघडल्यानंतर रोकड चोरीचा प्रकार उघडकीस आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. शाळेकडून सहलीचे आयोजन केले जाणार होते. सहलीसाठी विद्यार्थ्यांनी जमा केेलेली तीन लाख १७ हजारांची रोकड कार्यालयात ठेवण्यात आली होती, अशी माहिती शिक्षकांनी पोलिसांना दिली. शाळेच्या कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण बंद असल्याचे आढळून आले आहे. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.