पुणे : सायबर चोरट्यांकडून शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरट्यांनी कोंढवा भागातील एका ज्येष्ठ नागरिकाला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून ४३ लाख ७५ रुपयांची फसवणूक केली. ज्येष्ठाने चोरट्यांच्या खात्यात जमा केलेली ४३ लाख रुपयांची रक्कम कोंढवा पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे परत मिळवण्यात यश आले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे ज्येष्ठाला दिलासा मिळाला आहे. पोलिसांच्या कामगिरीचे त्यांनी कौतूक करुन आनंद व्यक्त केला आहे.
याबाबत एका ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारदार कोंढवा भागात राहायला आहेत. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. ज्येष्ठाने चोरट्यांच्या खात्यात सुरुवातीला काही रक्कम जमा केली. चोरट्यांनी त्यांना परताव्यापोटी काही रक्कम दिल्याने त्यांचा विश्वास बसला. ज्येष्ठाने त्यांना आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. रक्मक गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. त्यांनी चोरट्यांशी संपर्क साधला. तेव्हा चोरट्यांचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नॅशनल सायबर क्राइम ऑनलाइन पोर्टलवर तक्रार दिली होती. या तक्रारीची माहिती कोंढवा पोलिसांच्या सायबर गुन्हे तपास कक्षाला देण्यात आली. त्याानंतर याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गु्न्हा दाखल करुन तपास सुरू केला. ज्येष्ठाने सायबर चोरट्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली होती. पोलिसांनी आर्थिक व्यवहारांची माहिती घेतली. सहायक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण, राहुल शितोळे, अश्विनी सावंत यांनी बँकेशी संपर्क साधला.चोरट्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम त्वरीत गोठविण्याची विनंती पोलिसांनी बँकेकडे केली.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गाेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक रऊप शेख, सहायक निरीक्षक मयूर वैरागकर, अरुण किटे, लवेश शिंदे यांनी ही कामगिरी केली.
आमिषांना बळी पडू नका
सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. आतापर्यंत चोरट्यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. चोरट्यांच्या आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.