लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनील वारे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना आदेश दिला आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली आहे. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची तारीख राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केली आहे. सर्व जात पडताळणी समित्यांनी जुलै २०२३ अखेर ४३ हजार ३५९ प्रकरणे निकाली काढली आहेत.
हेही वाचा… पुणे : ससून रुग्णालयाला सोसवेना रुग्णांचा भार!
मात्र काही विद्यार्थ्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये विलंबाने अर्ज सादर केले आहेत. सीईटीच्या पात्र विद्यार्थ्यांना त्रुटींची पूर्तता करण्याबाबत मेसेज आणि ई-मेलद्वारे कळवूनही विद्यार्थ्यांनी जात पडताळणी समितीशी संपर्क साधलेला नाही. त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी अर्जदारांची आहे. मात्र त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शनिवार आणि रविवारी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वारे यांनी सांगितले.