बहरलेला दिन का राजा, एक्झोराचे गर्द गेंद, सतत फुलणारी सदाफुली. पुष्परसाचे हे पेले आहेत खास पाहुण्यांसाठी, फुलपाखरांसाठी. आपण घरी पाहुणे येणार असतील तर त्यांच्या आवडीचा पदार्थ करतो असाच विचार मंदाकिनीताई करतात फुलपाखरांसाठी! मिरज येथील व्यावसायिक क्षेत्रातील अग्रणी मराठे घराण्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व मंदाकिनीताई मराठे यांच्या बंगल्याच्या आवारातील अर्ध्या एकराच्या ऐसपैस बागेत खास झाडं आहेत फुलपाखरांसाठी. कधी किनरवापी, कधी चंदेरी, कधी अंजिरी, कधी शेंदरी, कधी मखमली, कधी भरजरी अशी मुग्ध दुनिया म्हणजे फुलपाखरांची दुनिया. मंदाताई म्हणजे निसर्गप्रेमी, सौंदर्यासक्त, ऋजू अन् लाघवी व्यक्तिमत्त्व; त्यांच्या अभिजात गर्भश्रीमंतीचा परिमल त्यांच्या बागेतही दरवळतो. त्यांच्या बागेने केव्हाच अर्धशतक पार केले आहे. इथे काटेकोर नियोजन नाही तर कुटुंबवत्सलता आहे. त्यामुळे झाडांची, फुलझाडांची, वेलींची ++भाऱ्यांची विविधता तर आहेच पण निसर्गातील प्रत्येक घटकाबद्दल आत्मीयता आहे. पक्षी निरीक्षणाचा छंद होताच पण बागेत विविध फुलपाखरे येतात हे जाणवल्यावर त्यांनी फुलपाखरांचा अधिक अभ्यास केला. ‘दिन का राजा या वेलीवर फुलपाखरे अक्षरश: लगडलेली असत, हळूहळू कोणाला काय आवडतं हे समजत गेलं,’ असं मंदाताईंनी सांगितलं.

फुलपाखरांना दोन प्रकारच्या वनस्पती लागतात. एक खाद्य वनस्पती अन् दुसरी पुष्परस वनस्पती. फुलपाखरे ठरावीक खाद्य वनस्पतीवर मोहरीसारखी अंडी घालतात. अंडय़ातून अळी बाहेर आली की प्रथम अंडय़ाचे कवच खाते. मग खाद्य वनस्पतीची कोवळी पानं, नंतर जून पान खाते, म्हणजे अगदी फडशा पाडते. अशा वेळी बागेत खाल्लेली पानं व विष्ठा दिसते. अर्थात, यासाठी निरीक्षणाची सवय हवी. अळीचे नंतर कोषात रूपांतर होते. सुरक्षित जागी कोश बनवण्यासाठी अळी काही मीटर अंतरही पार करून जाते कारण तिला भय असते पक्ष्यांचे. झाडावर कोश स्थानापन्न झाला की काही दिवसांनी इवल्याशा कोशातून पूर्ण वाढलेलं फुलपाखरू बाहेर पडते. पंख सुकवते अन् आकाशात विहरू लागते पुष्परसाच्या शोधात. आपल्याला आवडणारी झाडं फुलपाखरांना आवडतातच असे नाही. गुलाब, मोगऱ्याकडे ती बघतही नाहीत. उलट आपण तण म्हणून काढून टाकतो ती दगडी पाल्याची फुले फुलपाखरांना खूप आवडतात. नको असलेली वनस्पती काढून टाकताना तिचे निसर्गातील स्थान जाणून घेणे महत्त्वाचे आहे असे मंदाताईंनी सांगितले. त्यांचा अभ्यास, सखोल विचार अन् संवेदनशीलता पाहून मी थक्क झाले. ही संवेदनशीलता मुलांमध्ये यावी अन् त्यांना निसर्गातल्या गमती माहीत व्हाव्यात, यासाठी त्या प्रयत्नशील असतात. एकदा त्यांच्या बोन्साय संग्रहातल्या उंबराच्या वामनवृक्षावर कॉमन क्रो फुलपाखराचा चंदेरी मण्यासारखा कोश लटकत होता. त्यांनी हा वृक्षच शाळेत नेऊन ठेवला अन् मुलांनी फुलपाखराचा जन्मसोहळा अनुभवला. ‘अगं, हा आनंद सोहळा मी किती तरी वेळेस पाहिला आहे, कॅमेऱ्यात टिपला आहे. फुलपाखरू जपानी पंख्यासारखे दुमडून इवल्याशा कोशात बसते. हा निसर्गाचा चमत्कार आहे. निसर्गात नित्यनूतन आनंद असतो, फक्त तशी दृष्टी लागते,’ त्यांनी सांगितले. खूप पावसाळा सोडला तर वर्षभर बागेत फुलपाखरे दिसतात. पक्षी निरीक्षण पहाटे केले जाते पण सकाळी फुलपाखरे निष्क्रिय असतात. पंख पसरून उन्ह खात बसतात. अकरा ते चार वेळात ती सक्रिय असतात, असे त्यांचे निरीक्षण आहे.

tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Dhirendrakrishna Shastri makes unscientific claims promote superstition under guise of spirituality
धीरेंद्रकृष्ण यांच्या कार्यक्रमास अंनिसचा विरोध, अंधश्रध्देस खतपाणी घालणाऱ्यांना परवानगी दिल्याबद्दल नाराजी
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : हीच ‘सप्रेम इच्छा’अनेकांची!
Where a giant animal like a dinosaur was destroyed, what happened to microscopic organisms! Man should take the initiative to protect biodiversity know more about
जैवविविधतेच्या संरक्षणासाठी माणसानेच पुढाकार घ्यावा

मंदाताईंनी बागेत खाद्य वनस्पती म्हणून रुई, कढिपत्ता, लिंबू, अमलताश, बदकवेल, पानफुटी, कृष्णकमळ, सीता-अशोक या वनस्पती लावल्या आहेत. वृक्ष पाच फुटांपर्यंत छाटले तर निरीक्षणास सोपे पडते. हा त्यांचा अनुभव. पुष्परसासाठी झेंडू, घाणेरी, शंकासुर, कॉसमॉस, सुपारीची फुले, जमाईकन ब्लू स्पाईस, सदाफुली, व्हर्सिना, दिन का राजा, पेंटास, एक्झोरा अशी फुलझाडं लावली आहेत अन् टाकावू वाटणाऱ्या दगडी पाल्यालाही बागेत स्थान आहे. खाद्य वनस्पती व पुष्परस वनस्पती असल्या की फुलपाखरे आकर्षित होतात. वेगळं नियंत्रण लागत नाही अन् त्यांच्यामुळे बागेला चैतन्य येते, असे मंदाताईंना वाटते. या झाडांवर रासायनिक औषधांची फवारणी अजिबात करायची नाही. हा नियमही त्या बजावतात, त्यांच्या बागेतल्या पाल्यापासून, ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट करून तेच बागेत वापरतात. वयाची ऐंशी वर्षे पार केली तरी हिरवळ गार्डन क्लबमध्ये त्या सक्रिय आहेत. फुलपाखरू उद्यानाच्या कार्यशाळा घेतात. निसर्गप्रेमींना त्यांच्या आवडीची झाडं देणे त्यांना आवडते. गेली पन्नास वर्षे अनेक झाडे, वेली, वामन वृक्ष, मिनिएचर गार्ड्स त्यांच्या छायेत वाढत आहेत. पुष्परचना करणे, पानाफुलांची भेटकार्ड करणे हा त्यांचा आवडता छंद आहे. मलाही त्यांनी असेच भेटकार्ड पाठवून कौतुक केले. माझ्यासाठी हा अमूल्य ठेवा आहे. आपल्या ज्ञानात भर पडावी, तज्ज्ञांचे विचार कळावेत, यासाठी त्या राधानगरी, अंबोली येथे झालेल्या नॅशनल बटरफ्लाय फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या होत्या. पक्षी निरीक्षणाइतका फुलपाखरू निरीक्षणाचा छंद लोकप्रिय नाही, अशी खंत त्या व्यक्त करतात.

‘अगं, माझ्या बागेत वीस जातीच्या फुलपाखरांची नोंद केली आहे. महाराष्ट्राचे देखणे फुलपाखरू ब्लू मॉरमॉनही माझ्या बागेत येतं. त्याला वनलिंबू आवडते. पण पुष्परसासाठी ते एक्झोरावर हमखास येते,’ त्या उत्साहाने सांगत होत्या अन् मला आठवत होत्या बोरकरांच्या ओळी ‘बोला कुणा कुणा हवे फुलपाखरांचे थवे’.

मंदाकिनीताईंची निसर्गविषयक आत्मीयता, त्यासाठी लोकजागृतीचे प्रयत्न, बालमनावर संस्कार करण्याची तळमळ सगळेच वंदनीय आहे.

खाद्य वनस्पती व फुलपाखरे

* रुई- प्लेन टायगर,

*  वड, उंबर, कण्हेर- कॉमन क्रो

*  पान फुटी- रेड पिअरो,

*  कढीपत्ता लिंबू- लाइम बटरफ्लाय

*  कृष्णकमळ- टोनी कॉस्टर

*  बहावा- कॉमन इमिग्रंट, कॉमन ग्रास यलो

*  सीता अशोक- टेण्ड जे

*  बदक वेल- कॉमन रोज, क्रिमसन रोज

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)