जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पीएमपी थांब्यावर तरुणाचा मोबाइल संच हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना नागरिकांनी पाठलाग करुन पकडले.
या प्रकरणी मधु व्यंकय्या (वय ५५), पी. प्रेमकुमार ब्रम्हेय्या (वय २३), पी धनराज कन्हैया (वय २९, तिघे मूळ रा. ग्रीन पार्क, हैद्राबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रतीक खेडकर (वय १९, रा. वडगाव बुद्रुक) याने या संदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खेडकर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पीएमपी थांब्यावर थांबला होता. त्या वेळी व्यंकय्या, ब्रम्हेय्या, कन्हैया यांनी खेडकर याच्या हातातील १५ हजारांचा मोबाइल संच हिसकावला आणि तिघेजण मध्यवर्ती शासकीय कार्यालयाच्या दिशेने पळाले. खेडकरने आरडाओरडा केला. खेडकर आणि नागरिकांनी पाठलाग करुन तिघांना पकडले. त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे तपास करत आहेत. चोरट्यांनी मोबाइल हिसकावण्याचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशाचा मोबाइल हिसकावला
स्वारगेट एसटी स्थानक परिसरात प्रवाशाचा मोबाइल संच चोरट्यांनी हिसकावून नेला. याबाबत आरिफ सय्यद (वय ३८, रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दिली आहे. सय्यद कुटुंबीय स्वारगेट एसटी स्थानकात थांबले हाेते. त्या वेळी तीन चोरट्यांनी सय्यद यांच्या हातातील मोबाइल संच हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करत आहेत.