प्रवास व हॉटेल भत्त्याची खोटी बिले तयार करून लाखोंची फसवणूक केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने सेंट्रल इन्स्टिटय़ुट ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या (सीआयआरटीसी) माजी संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निवृत्त ब्रिगेडिअर जी. दिनशॉ असे गुन्हा दाखल केलेल्या निवृत्त संचालकाचे नाव  आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, दिनशॉ यांनी त्याच्या कार्यकाळात प्रवास आणि जेवण खर्चाच्या भत्त्याची खोटी बिले तयार करून ती मंजूर करवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. हॉटेल आणि प्रवास बिलाचे पैसे लावण्याचे खोटे बारा प्रकार सीबीआयच्या तपासात समोर आले आहेत. हा अपहार साधारण दहा ते बारा लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे. एका प्रकरणात दिनशॉ यानी हॉटेलमध्ये राहिलेल्या एका रुमचे बिल सादर केले आहे. हॉटेलमध्ये त्यांनी सादर केलेल्या बिलावरील क्रमांकाची खोलीच अस्तित्वात नसल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी गुन्हा दखल करून अधिक तपास सुरू आहे.