पुणे: भाजपच्या पदाधिकार्‍यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सीबीआयने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, सरकारी वकील प्रविण चव्हाण, तत्कालीन पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, निवृत्त सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण, विजय पाटील यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात सादर केलेल्या पेन ड्राईव्हवरुन सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न तत्कालीन राज्य सरकारकडून केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केला होता. त्यावेळी त्यांनी सभागृहात पेन ड्राईव्ह सादर केला होता. विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयातील बसविलेल्या घड्याळात कॅमेर्‍यातून हे सर्व व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आल्याचे पेन ड्राईव्ह मधून उघडकीस आले होते. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. संबंधित व्हिडिओ चित्रीकरणात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण कट रचताना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना गुन्ह्यामध्ये अडविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा करताना दिसून आले होते.

हेही वाचा : Ajit Pawar on Baramati Elections: “मीही आता ६५ वर्षांचा झालोय”, अजित पवारांचं बारामतीमध्ये सूचक विधान; म्हणाले, “पिकतं तिथे विकत नसतं”!

सरकारी वकील प्रविण चव्हाण हे अर्जदार आणि भाजपच्या इतर नेत्यांवर खोट्या तक्रारी तयार करणे, साक्षीदारांना शिकविणे, रोख रक्कमेची व्यवस्था करणे, तपास अधिकार्‍यांना सूचना देण्याच्या पहिल्या टप्प्यापासून खोटे गुन्हे दाखल करण्यात गुंतले होते. चाकू लपविणे, छापा कसा टाकायचा, अमली पदार्थ व्यवसाय कसा दाखवायचा, या प्रकरणात मोक्का कारवाई कशी करायची, याबाबत प्रविण चव्हाण व्हिडिओ चित्रीकरणात अधिकार्‍यांना सांगताना दिसून आले होते. अ‍ॅड. प्रविण चव्हाण, तक्रारदार विजय भास्करराव पाटील आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत भाजप नेत्यांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याचा कट रचला होता. त्यातूनच जळगावमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला.

हेही वाचा : आळंदी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन

जळगावमधील गुन्हा कोथरूडमध्ये पोलीस ठाण्यात वर्ग

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेतील वादाबाबत भाजप नेत्यांना गोवण्यासाठी गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. गुन्हेगारी कट रचण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी विजय पाटील, तत्कालीन पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, निवृत्त सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या सोबत खटल्यात भाजप नेते आणि इतरांना गुंतविण्यासाठी खोटे साक्षीदार आणि पुरावे तयार करण्यात आले.असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi filed case against former home minister anil deshmukh for false cases on bjp leaders pune print news rbk 25 css