लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) बारावीची परीक्षा आणि राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतल्या जाणाऱ्या समाइक प्रवेश परीक्षांतील (सीईटी) दोन परीक्षा एकाच वेळी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सीईटी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होणार असून, सीईटीच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी करण्यात येत आहे. सीईटी सेलने याबाबत दखल घेऊन नियोजित सीईटीच्या तारखा बदलण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सीबीएसईने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार १ ते ४ एप्रिल या कालावधीत बारावीची इतिहास, भाषा विषय आणि गृहविज्ञान (होम सायन्स) आणि मानसशास्त्र या विषयांची परीक्षा आहे. तर सीईटी सेलतर्फे १ ते ३ एप्रिल या कालावधीत बीसीए, बीबीए, बीएमएम, बीएमएस अभ्यासक्रमाची सीईटी नियोजित आहे. तर ४ एप्रिल रोजीच पाच वर्षे मुदतीच्या विधी अभ्यासक्रमाची (एलएलबी) परीक्षा होणार आहे. त्यामुळे सीबीएसईचे बारावीचे विद्यार्थी सीईटी परीक्षांना मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आणखी वाचा-अवयवरूपी दानामुळे १८१ जणांना मिळालं जीवदान! मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे प्रमाण सर्वाधिक
महापेरेंट्स पालक संघटनेचे दिलीपसिंह विश्वकर्मा म्हणाले, ‘राज्यात अनेक शाळा सीबीएसईशी संलग्न आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य आहे. त्यामुळे परीक्षांच्या तारखा पाहून सीईटीचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांच्या संवादाच्या अभावातून गोंधळ निर्माण झाला आहे. अशा प्रकारांतून विद्यार्थी, पालकांना मनस्ताप होत आहे. आता सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेवेळी होणाऱ्या सीईटीच्या तारखा बदलल्या पाहिजेत अन्यथा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
दरम्यान, सीबीएसईची बारावीची परीक्षा आणि सीईटी एकाच वेळी होत असल्याची दखल घेण्यात आली आहे. लवकरच त्यात बदल करण्यात येणार आहे, असे सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
© The Indian Express (P) Ltd