लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्या अनुषंगाने सीबीएसईने विद्यार्थी आणि पालकांसाठी मोफत दूरध्वनीद्वारे समुपदेश सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अंतर्गत शासकीय आणि खासगी शाळांतील ६५ मुख्याध्यापक, प्रशिक्षित समुपदेशक आणि विशेष मार्गदर्शकांकडून समुपदेशन केले जाणार आहे.

सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत, तर लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. अनेकदा विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण येते. परीक्षेच्या ताणाचा मानसिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर परीक्षेची ताणरहित तयारी करता येण्यासाठी सुमपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात आयव्हीआरएस सुविधा २४ तास मोफत दिली जाणार आहे.

आणखी वाचा-नववर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी गर्दी; पुण्याच्या मध्यभागातील वाहतुकीचा बोजवारा

१८००-११-८००४ या क्रमांकावर दूरध्वनी केल्यावर परीक्षेची तयारी, वेळ आणि ताण व्यवस्थापन, सीबीएसई अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आदी माहिती इंग्रजी आणि हिंदीमध्ये मिळणार आहे. तसेच परीक्षेची तयारी, ताण आणि वेळेचे व्यवस्थापन अशा विषयांवरील पॉडकास्ट आणि दूरध्वनीद्वारे समुपदेशन सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी ताणमुक्त वातावरणात परीक्षा देण्याच्या उद्देशाने सीबीएसईकडून १९९८पासून समुदेशनाचा उपक्रम राबवला जात असल्याचे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले.

Story img Loader