लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्याने मिळवलेल्या गुणांची टक्केवारी, श्रेणी तयार करून दिली जाणार नाही. तर विद्यार्थी प्रवेश घेणाऱ्या शिक्षण संस्थेला, नोकरी देणाऱ्या नियोक्त्यालाच विषयांनिहाय गुणांच्या आधारे एकूण टक्केवारी तयारी करावी लागणार आहे.
सीबीएसईने या संदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. परीक्षांच्या तारखा सीबीएसईकडून मे महिन्यातच जाहीर करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांमधील स्पर्धा थांबवण्यासाठी करोना काळात सीबीएसईने गुणवंत विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्याची पद्धत बंद केली. त्यानंतर आता गुणांची टक्केवारी, श्रेणी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आणखी वाचा-आईला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला…
सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी परिपत्रकात नमूद केल्यानुसार, विद्यार्थ्यांचे गुण मोजण्याचे निकष जाहीर करण्याबाबतची मागणी करण्यात येत आहे. मात्र, गुणांची टक्केवारी, श्रेणी दिली जाणार नाही अशी तरतूद सीबीएसईच्या नियमावलीतील उपविधीमध्ये आहे. विद्यार्थ्याला पाचपेक्षा जास्त विषय देण्यात आले असल्यास त्यातील सर्वोत्तम पाच विषय निवडण्याचा निर्णय संबंधित शिक्षण संस्था किंवा नियोक्ता घेऊ शकतात. सीबीएसईकडून गुणांची मोजणी, टक्केवारी, श्रेणी जाहीर केली जाणार नाही. उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी गुणांची टक्केवारी आवश्यक असल्यास त्याबाबतची कार्यवाही प्रवेश देणारी शिक्षण संस्था किंवा नियोक्ता करू शकतात.
सीबीएसईने दहावी आणि बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले असले, तरी सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. गेल्यावर्षी दहावीच्या २१ लाखांहून अधिक, बारावीच्या १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.