पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांना संकेतस्थळावर कर्मचारी आणि अन्य माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत वारंवार निर्देश देऊनही त्याचे पालन झाले नसल्याने आता एक महिन्यात कार्यवाही न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीबीएसईचे सचिव हिमांशू गुप्ता यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सीबीएसईने देशभरातील संलग्न शाळांना संकेतस्थळ तयार करून शिक्षकांची पात्रता आणि अन्य माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी एका महिन्याची मुदत देण्यात आली होती. त्या बाबत दोन वर्षांपूर्वी दोन वेळा परिपत्रके प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, अनेक शाळांचे संकेतस्थळ सक्रिय नसल्याचे दिसून येते. काही शाळांनी कागदपत्रे उपलब्ध करून दिलेली नाहीत, तर काही शाळांनी मोजकीच कागदपत्रे उपलब्ध केली आहेत. तर काही शाळांनी कागदपत्रे उपलब्ध करून दिली असली, तरी त्याचे दुवे सक्रिय नाहीत. काही शाळांनी कागदपत्रे उपलब्ध केल्याबाबत संकेतस्थळाच्या पहिल्या पानावर ठळकपणे माहिती दिलेली नसल्याचे निदर्शनास आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा…राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

या पार्श्वभूमीवर सर्व संलग्न शाळांनी परिपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून सर्व कागदपत्रे, माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यासाठी तीस दिवसांची मुदत देण्यात येत आहे. आतापर्यंत सूचनांचे पालन न केलेल्या शाळांसाठी ही शेवटची संधी असेल. ज्या शाळांनी अद्याप सूचनांचे पालन केले नाही त्यांच्यासाठी ही शेवटची एकच संधी असेल. या पुढे त्यांना दुसरी संधी दिली जाणार नाही. संबंधित शाळांवर सीबीएसईच्या उपविधीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbse instructed affiliated schools to publish staff and other information on their websites pune print news ccp 14 sud 02