लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यंदा ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत निकाल १.२८ टक्क्यांनी घटला आहे. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागातील ९६.९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. देशात पुणे विभाग पाचव्या स्थानी आहे.

सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सीबीएसईने १५ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी एकूण २१ लाख ८४ हजार ११७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या २१ लाख ६५ हजार ८०७ विद्यार्थ्यांपैकी २१ लाख १६ हजार ७७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी नोंदणी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ७४ हजारांनी वाढली होती. उत्तीर्णांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण जास्त आहे. करोना पूर्व काळात, २०१९ मध्ये दहावीच्या परीक्षेचा निकाल ९१.१० टक्के लागला होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकाल घटला असला, तरी करोनापूर्व काळाच्या तुलनेत यंदा निकाल वाढल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचा… आता राज्यातील शिक्षकांमध्ये होणार स्पर्धा.. ई साहित्य निर्मिती स्पर्धेसाठी शिक्षण विभागाचा पुढाकार!

राष्ट्रीय पातळीवरील विभागनिहाय निकालाचा आढावा घेतला असता त्रिवेंद्रम विभागाने ९९.९१ टक्क्यांसह देशात आघाडी घेतली. तर गुवाहाटी विभागाचा निकाल सर्वांत कमी ७६.९० टक्के लागला. बंगळुरू विभागाचा ९९.१८ टक्के, चेन्नई विभागाचा ९९.१४ टक्के, अजमेर विभागाचा ९७.२७ टक्के, पुणे विभागाचा ९६.९२ टक्के, पटना ९४.५७, चंदीगढ विभागाचा ९३.८४ टक्के, भुवनेश्वर विभागाचा ९३.६४ टक्के, प्रयागराज विभागाचा ९२.५५ टक्के, नोएडा विभागाचा ९२.५० टक्के, पंचकुला विभागाचा ९२.३३ टक्के, भोपाळ विभागाचा ९१.२४, दिल्ली वेस्ट ९०.६७, डेहराडून ९०.६१, दिल्ली पूर्व विभागाचा ८८.३० टक्के निकाल लागला.

हेही वाचा… पिंपरी : तळेगाव नगर परिषदेसमोर दिवसाढवळ्या गोळीबार, जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा खून

पुरवणी परीक्षा जुलैमध्ये

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी आता पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानुसार पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. परीक्षेच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील. पुरवणी परीक्षा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसारच होणार असल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले.

गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन

पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, छायाप्रत, पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. ही सुविधा १६ मेपासून सुरू होणार असल्याची माहिती सीबीएसईने दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbse result 2023 cbse 10th pune division result is 96 92 percent pune print news ccp 14 dvr
Show comments