राज्याच्या शिक्षण विभागाने शाळांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला असला, तरी केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मात्र आता उलट भूमिका घेतली आहे. यापुढे सीबीएसईच्या शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या वर्गासाठी सहा दिवस शाळा असणार आहे. याबाबत सीबीएसईने शाळांना सूचना दिल्या आहेत.
 पहिली ते आठवीपर्यंतच्या सीबीएसईच्या शाळांना पाच दिवसांना आठवडा होता. सीबीएसईच्या शाळांना पाच दिवसांचा आठवडा असतो मग राज्य मंडळाच्या शाळांना दोन दिवस सुट्टी का नाही, असा वाद गेली अनेक वर्षे राज्यात रंगला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी राज्याच्या शिक्षण विभागाने राज्यातील शाळांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. मात्र, आता पुन्हा एकदा असाच वाद सुरू होणार आहे. सीबीएसईने सहावी ते आठवीच्या शाळांसाठी ६ दिवसांचा आठवडा असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शनिवारची सुट्टी आता मिळणार नाही.
सीबीएसईने या शैक्षणिक वर्षांसाठी अभ्यासक्रम आणि शाळा नियमावलीबाबत नुकतेच एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार शाळांनी सहावी ते आठवीच्या वर्गाना सहा दिवस रोज सहा तास अध्यापन करणे अपेक्षित आहे. यानुसार वर्षभरात प्रत्येक शिक्षकाने बाराशे तास काम करणे अपेक्षित आहे. त्यामधील २०० तास हे अधिकचे किंवा विशेष तास, इतर प्रशासकीय कामे यांच्यासाठी असणे गरजेचे आहे. पहिली ते पाचवीच्या शाळांसाठी मात्र पाच दिवसांचाच आठवडा राहणार आहे. मात्र, शिक्षकांना मात्र दोन दिवस सुट्टी मिळणार नाही. दोन दिवसांच्या सुट्टीपैकी एका दिवशी शिक्षकांनी साधारण दीड तास काम करावे लागणार आहे. या वेळात पुढील आठवडय़ाचे नियोजन, वर्गाची तयारी अशा गोष्टी शिक्षकांनी करणे अपेक्षित असल्याचे सीबीएसईने म्हटले आहे.
स्कूलबसमध्ये शिक्षकही हवेत
सीबीएसईच्या ज्या शाळा विद्यार्थ्यांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देतात. त्यांच्या बसमध्ये विद्यार्थ्यांबरोबर एका शिक्षकाने उपस्थित राहावे अशा सूचना सीबीएसईने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षकांची उपस्थिती आवश्यक असल्याचे सीबीएसईने नमूद केले आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाच्या वारंवार सूचनांना धूप न घालणाऱ्या राज्यातील बडय़ा शाळांना आता स्कूलबसमध्ये शिक्षक नेमावे लागणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा